रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून परदेश प्रवासात मोबाईल कनेक्टिव्हिटी चालू ठेवणं एक आव्हान ठरते. अशावेळी परदेश प्रवासात प्रवाशांना एकापेक्षा जास्त सिम कार्ड्स बाळगणे, प्रवासाला निघण्यापूर्वी स्थानिक किंवा ट्रॅव्हल सिम खरेदी करणे, आपला मूळ भारतीय मोबाईल नंबर वापरण्याची सोय गमावणे, महत्त्वाचे बँक किंवा लॉगिन ओटीपी न मिळणे, असुरक्षित सार्वजनिक वाय-फायवर अवलंबून राहणे, कागदपत्रांची कटकट किंवा अवाढव्य रोमिंग बिलांची चिंता यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. प्रवाशांची हीच समस्या लक्षात घेऊन वी ने आता एक महत्त्वापूर्ण घोषणा केली आहे.
‘वी’ आता या संपूर्ण अनुभवात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. वी आपल्या ग्राहकांसाठी परदेश प्रवास अतिशय सोपा व सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘वी’ने त्यांच्या प्लॅन्समध्येच ‘निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंग’ समाविष्ट केले आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता परदेशातील कनेक्टिविटी अत्यंत सोपी, सर्वसमावेशक, विनाव्यत्यय आणि चिंतामुक्त झाली आहे. अभिनेता शाहरुख खान यांचा सहभाग असलेल्या एका नवीन टीव्ही जाहिरातीच्या माध्यमातून ही संकल्पना प्रेक्षकांसमोर आणली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टपेड, प्रीपेड आणि एंटरप्राइज ग्राहकांना आता वर्षभरात ३ परदेश प्रवासांपर्यंत मोफत इंटरनॅशनल रोमिंगचा फायदा मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय डेटा मर्यादा आणि आऊटगोइंग कॉलिंग मिनिट्सचा समावेश असणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहक वर्षाला तब्बल ९,००० रुपयांपर्यंत बचत करू शकणार आहेत.
‘वी ॲप’ सुरू करून ‘इंटरनॅशनल रोम-फ्री प्लॅन्स’ निवडल्यानंतर ग्राहकांना परदेश प्रवासात मोफत आंतरराष्ट्रीय कनेक्टिविटीचा आनंद घेता येणार आहे. या नवीन सुविधेअंतर्गत, पात्र प्लॅन्स वापरणाऱ्या ग्राहकांना निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंगसह इतर अनेक फायद्यांचा आनंद घेता येईल. यामध्ये ₹५०१ पासून सुरू होणारे पोस्टपेड प्लॅन्स, वार्षिक प्रीपेड अनलिमिटेड डेटा प्लॅन्स आणि एंटरप्राइज ग्राहकांसाठी ₹४५१ पासून सुरू होणाऱ्या कॉर्पोरेट प्लॅन्सचा समावेश आहे.






