कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ... आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
आयओएस 26 आणि त्यानंतरच्या अपडेट्ससाठी अॅपलने एक नवं फीचर आणलं आहे. नेम रिकॉग्निशन नावाचे हे एक नवे एक्सेसिबिलिटी फीचर यूजर्ससाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे. हे फीचर तुमच्या आयफोनला सतत तुमचे नाव ऐकण्यासाठी सक्षम बनवते. जसे कोणी तुम्हाला आवाज देते, फोन तात्काळ तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवून अलर्ट देते. विशेष म्हणजेच यासाठी तुम्हाला सतत फोनची स्क्रीन देखील पाहावी लागत नाही. मग, हे फीचर नक्की कसे काम करते? चला जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनमध्ये नेम रिकॉग्निशन नावाचे हे एक नवे एक्सेसिबिलिटी फीचर आहे. या फीचरच्या मदतीने फोन आजूबाजूचे काही खास आवाज ओळखू शकतो. यामध्ये डोरबेल, सायरन, अलार्म यासांरख्या आवाजांव्यतिरिक्त काही विशेष प्रसंगांमध्ये व्यक्तीचे नाव ओळखण्याचा देखील पर्याय आहे.
जेव्हा तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी असाल जिथे खूप आवाज किंवा गोंधळ असेल किंवा तुमच्या कानात हेडफोन असतील अशाप्रसंगी हे फीचर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. समजा, तुमच्या आजूबाजूला फार गोंधळ आहे आणि कोणी तुम्हाला आवाज देत असेल तर अशावेळी आयफोन हा आवाज ओळखून तुम्हाला सूचना देऊ शकते.
आयफोनच्या या फीचरचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांना होणार आहे, जे सतत हेडफोन्सचा वापर करतात. गाणी ऐकताना आजूबाजूचा आवाज कमी ऐकू येतो, अशावेळी आयफोनचे हे फीचर तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. लक्षात ठेवा की, हे फीचर 100% अचूकतेची हमी देत नाही. मोठ्या आवाजामुळे, अनेक व्यक्ती एकाच वेळी बोलत असल्यास किंवा आवाज खूप दूर असल्यास ओळखण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.






