
WhatsApp Web Update: व्हॉट्सॲप कॉल करण्याासाठी ॲपची गरज नाही! आता थेट ब्राउझरवरून होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल
आता व्हॉट्सॲप वेब वापरणारे यूजर्स थेट ब्राऊझरमधून व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. तसेच यूजर्सना कॉल ट्रांसफर आणि वेटिंग रूमसारखे फीचर्स देखील मिळणार आहेत. यामुळे आता तुमचा व्हॉट्सॲप वेब वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. आता यूजर्स कोणतेही वेगळे ॲप डाऊनलोड न करता देखील थेट व्हॉट्सॲप वेबमधून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. यासोबतच कंपनीने कॉल ट्रान्सफर, वेटिंग रूम आणि बॅकग्राउंड नॉइज सप्रेशन यांसारखे अनेक नवीन फीचर्स देखील सादर केले आहेत. यामुळे यूजर्सचा व्हॉट्सॲप वेबवरील कॉलिंगची अनुभव अधिक चांगला होणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
आतापर्यंत लॅपटॉप किंवा कंप्युटरवर कॉल करण्यासाठी व्हॉट्सॲप डेस्कटॉपचा वापर करावा लागत होता. मात्र नव्या अपडेटनंतर आता यूजर्स कोणत्याही सपोर्टेड वेब ब्राउजरमध्ये व्हॉट्सॲप वेब ओपन करून थेट ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, हे कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे. तसेच कॉलिंगच्या वेळेवर देखील कोणतीही मर्यादा नाही आणि यासाठी कोणते चार्ज देखील द्यावे लागणार नाहीत.
व्हॉट्सॲपने त्यांच्या यूजर्ससाठी कॉल ट्रांसफर फीचर देखील लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स सुरु असलेला ग्रुप कॉल डिस्कनेक्ट न करता एका डिव्हाईसवरून दुसऱ्या डिव्हाईसवर ट्रांसफर करू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर ग्रुप कॉलवर असाल, तर कॉल डिस्कनेक्ट न करता तो थेट तुमच्या कॉम्प्युटरवर सुरू ठेवू शकता.
ग्रुप कॉल जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सॲप वेटिंग रुम फीचर देखील लाँच करण्यात आले आहे. आता कोणताही नवीन व्यक्ती ग्रुपमध्ये सहभागी होण्यापूर्वी वेटिंग रुममध्ये जाईल. यानंतर कॉल होस्ट ठरवेल की त्याला ग्रुप्स कॉलमध्ये सहभागी करायचे की नाही. या फीचरमुळे ग्रुप कॉलवर यूजर्सचा कंट्रोल आधीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. यामुळे अनोळखी लोकांना कॉलमध्ये सहभागी केले जाणार नाही.