AI सोबत शेअर करताय तुमचे वैयक्तिक फोटो? या महत्वाच्या गाईडलाईन्स नक्की वाचा, अन्यथा निर्माण होईल मोठा धोका
सध्या AI चा काळ आहे. AI च्या मदतीने ज्या पद्धतीने चांगल्या गोष्टी केल्या जाऊ शकतात, त्याच पद्धतीने AI वाईट गोष्टींसाठी देखील धोकादायक आहे. असे अनेकजण आहेत, जे AI सोबत बऱ्याच गोष्टी शेअर करतात. म्हणजेच अगदी दिवसभरात काय घडलं ते कोणता फोटो चांगला आहे, या सर्वांसाठी AI ची मदत घेतली जाते. नवीन फोटो क्लिक करण्यापेक्षा किंवा फोटो एडीट करण्यापेक्षा अनेकजण त्यांचा फोटो AI वर अपलोड करतात. तसेच एखादा नवीन ट्रेंड सुरु झाला की तो फॉलो करण्यासाठी देखील AI ची मदत घेतली जाते.
तुम्हाला केवळ तुमचा फोटो AI वर अपलोड करायचा असतो आणि संबंधित प्रॉम्प्ट द्यायचा असतो. त्यानंतर AI काही क्षणातच तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्टनुसार फोटो तयार करतो. हे ऐकायला मजेदार वाटत असले तरी देखील याचे अनेक धोके आहेत. AI सोबत तुमचा कोणताही वैयक्तिक फोटो शेअर करणं, अत्यंत धोकादायक ठरू शकतं. अशाच काही धोक्यांबद्दल आणि AI सोबत फोटो शेअर करताना कोणत्या गाईडलाईन्स फॉलो कराव्यात याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर कंपनीचा सर्वर हॅक झाला तर तुम्ही अपलोड केलेले सर्व फोटो हॅकर्सपर्यंत जाऊ शकतात, त्याचा चुकीचा वापर केला जाण्याची देखील शक्यता आहे. तसेच यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते.
तुम्ही AI वर जे फोटो अपलोड करत आहात, त्याच्या मदतीने तुमचा चेहरा ओळखला जाऊ शकतो. याचा वापर दुसरा डेटा जसे की सोशल मीडिया, पब्लिक रिकॉर्डसाठी देखील केला जाऊ शकतो. एवढंच नाही तर याच्या मदतीने तुमची डिजीटल ओळख देखील ट्रॅक केली जाऊ शकते.
डीपफेक बनाना, फेक प्रोफाइल किंवा चुकीचे एडीट, अशा पद्धतीने तुम्ही अपलोड केलेल्या फोटोचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.
अनेकदा कंपन्या त्यांचा डेटा त्यांचे पार्टनर किंवा थर्ड-पार्टी सर्विसेजसोबत शेअर करते, ज्यामुळे तुमचे फोटो नकळतपणे चुकीच्या हाती लागू शकतात.
फोटो शेअर करताना लक्षात ठेवा की त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, गाडी नंबर, घराचा पत्ता, अशी कोणतेही डिटेल्स दिसू नयेत. तुमच्या फोटोमध्ये असा कोणताही कंटेट असेल तर फोटो क्रॉप किंवा ब्लर करा.
अपलोड करण्यात आलेल्या फोटोमधील खोली किंवा घराच्या बॅकग्राउंडमध्ये संवेदनशील वस्तू (जसे की कॅलेंडरवरील पत्ते, मुलांचे फोटो, कागदपत्रे) दिसू नयेत.
मोबाईलने क्लिक केलेल्या फोटोमध्ये लोकेशन आणि डिव्हाईसची माहिती सेव्ह असते. त्यामुळे तुमचा फोटो शेअर करण्यापूर्वी, अॅप किंवा ऑनलाइन टूल वापरून मेटाडेटा काढून टाका.
AI वर हाय क्वालिटी फोटो अपलोड करू नका. कमी रिझोल्यूशन आणि छोटे फोटो अपलोड केल्यास गैरवापर करण्याचा धोका कमी होतो.
AI वर शेअर केला जाणारा प्रत्येक फोटो गरजेचा असेलच असं नाही. त्यामुळे AI वर फोटो अपलोड करताना विचार करा की खरंच हा फोटो अपलोड करणं गरजेचं आहे का?
Google Gemini किंवा कोणत्याही AI प्लॅटफॉर्मची प्रायव्हसी पॉलिसी वाचा. शक्य असेल तिथे “don’t save my data” किंवा “don’t use for training” असे पर्याय निवडा.
सार्वजनिक एआय सिस्टमवर मुलांचे किंवा कुटुंबाचे खाजगी फोटो कधीही पोस्ट करू नका. जर तुम्ही एखादा फोटो अपलोड केला असेल, तर तो कोणत्याही अकाउंट, फोरम किंवा सार्वजनिक साइटवर लीक झाला आहे का ते तपासा.