100 एकर मक्याच्या शेतात हरवलेल्या चिमुकल्याचा थर्मल कॅमेराने घेण्यात आला शोध; Video Viral
लहान मुलं तळहाताच्या फोडासारखी असतात, त्यांची योग्यरित्या काळजी घेतली नाही तर त्यांच्या जीवाचं बरंवाईट होऊ शकत. लहान मुलांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना इजा होण्याची शक्यता असते. लहान मुलं निष्काळजीपणा दाखवतात ज्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि त्यांची काळजी घेणे गरजचे असते. सध्याही सोशल मीडियावर अशीच एक घटना व्हायरल झाली आहे ज्यात २ वर्षांचा मुलाला वाचवण्यात पोलिसांना यश आले. वास्तविक, अमेरिकेतील मिशिगन भागात रात्रीच्या सुमारास एक दोन वर्षांचा मुलगा मक्याच्या शेतात हरवला यानंतर त्याला शोधण्यासाठी एक विशेष शोधकार्य सुरु करण्यात आले. हे शोधकार्य यशस्वीरित्या पार पडले असून मुलाला आता सुखरूप त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे शोधकार्य काही सोपे नव्हते, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो व्हायरल झाला आहे. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मिशिगन राज्यातील ब्लॅकमन चार्टर टाउनशिप येथे ५ एप्रिलच्या रात्री हरवलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला हिट सीकिंग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वीरित्या वाचवण्यात आले. ही घटना रात्री ८ वाजता घडली, जेव्हा त्या मुलाचे पालक काही मिनिटांसाठी घराबाहेर गेले आणि परत आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडा पाहिला व मुलगा घरात नव्हता, ही बाब लक्षात आली. “बाळ लिव्हिंग रूममध्ये खेळत होते. आम्ही काही वेळासाठी बाहेर गेलो आणि परत आलो तेव्हा दरवाजा उघडा होता,” असे मिशिगन राज्य पोलीस दलाचे ट्रूपर ब्रँडन फ्रँकलिन, जे टॅक्टिकल फ्लाइट ऑफिसर आहेत, त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जॅक्सन काउंटीतील राज्य पोलीस तात्काळ सक्रिय झाले. सर्जंट कोल मार्टिन आणि फ्रँकलिन हे त्या वेळी हेलिकॉप्टरमधून गस्त घालत होते. माहिती मिळताच त्यांनी इन्फ्रारेड थर्मल कॅमेऱ्याचा वापर करत शोध मोहिम सुरू केली. रात्री तापमान ४० अंश फॅरेनहाइटच्या खाली गेले होते आणि त्या चिमुकल्याने फक्त डायपर परिधान केला होता, त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर होती.
“बाळ वेळेत सापडलं नाही, तर परिस्थिती वेगळी झाली असती,” असे फ्रँकलिन म्हणाले. “आमच्याकडेही लहान मुले आहेत, आम्ही तो बाळ सापडल्याशिवाय थांबणार नव्हतो,” असे मार्टिन यांनीही स्पष्ट केले. सुमारे १५ मिनिटांच्या शोधानंतर, त्यांना एका महामार्गाजवळील नाल्यात थोडी हालचाल दिसली. थर्मल कॅमेऱ्यातून ती उष्णता जाणवली आणि लगेचच पोलिसांनी सांगितले, “सापडला तो!” तो चिमुकला शुद्धीत आणि सशक्त अवस्थेत आढळला. लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्याच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आले. “आम्ही जेव्हा कोणालाही शोधतो, तेव्हा एकमेकांना हवेत हाई फाइव देतो आणि आनंद व्यक्त करतो,” असे फ्रँकलिन म्हणाले. “आम्ही अशा प्रसंगांसाठीच प्रशिक्षण घेतो, कारण शेवटी एक आनंददायी शेवट होणे हीच आमची जबाबदारी आहे,” असे मार्टिन शेवटी म्हणाले.