Foreigners taste Paan Masala first time reactions viral
Karl Rock Viral Video : भारतातील “पान मसाला” हा शब्द ऐकताच डोक्यात जीभेवर रेंगाळणारी गोडसर चव, मसाल्याचा तिखटपणा, थोडा मिंटी फ्रेशनिंग आणि त्यासोबत भारतीय संस्कृतीची छटा उभी राहते. भारताच्या रस्त्यांवर, चौकाचौकात, गल्लोगल्ली हा पान मसाला सहज दिसतो. पण हा भारतीय चविष्ट पदार्थ जेव्हा परदेशी लोकांच्या जिभेवर पोहोचतो, तेव्हा काय होते? हाच अनुभव सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडचा प्रसिद्ध युट्यूबर कार्ल रॉक याने आपल्या परदेशी मित्रांना पहिल्यांदाच भारतातील प्रसिद्ध “रजनीगंधा पान मसाला” चाखायला दिला आणि त्यांचे अनुभव कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर २१ जुलै रोजी अपलोड करण्यात आला असून, आतापर्यंत तब्बल ५.५ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून धमाल उडवत आहे.
व्हिडिओमध्ये कार्ल रॉक आपल्या मित्रांना पान मसाला खाण्याची “योग्य पद्धत” शिकवताना दिसतो. तो त्यांना सांगतो “हे गिळायचं नाही, फक्त चोखायचं.” पण पान मसाला जिभेवर पडताच परदेशी मित्रांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून जातात. काहींचे डोळे मोठे झाले, काहींनी आश्चर्यचकित चेहऱ्याने एकमेकांकडे पाहिले, तर काहींना ते अगदी सहनही झाले नाही.
हे देखील वाचा : Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव
एका मित्राने थेट उद्गार काढले – “कोणी हे तोंडात का घालेल?”
दुसऱ्याने मात्र थोडा सकारात्मक सूर लावला – “यात थोडासा पुदिन्याचा फ्लेवर आहे.”
तर आणखी एका मित्राने ते ब्रेथ फ्रेशनर म्हणून वापरता येईल, असा सल्ला दिला. पण काही वेळातच त्याचे तोंड लालसर होऊ लागले आणि त्याला हा प्रयोग फारसा रुचला नाही. सर्वात मजेदार प्रतिक्रिया काळ्या टी-शर्टमधील मित्राने दिली. तो कार्लकडे नाट्यमय अंदाजात पाहत म्हणाला “आपल्या आयुष्यात अशी अनोखी चव फक्त तूच आणू शकतोस!” पण काही सेकंदांतच त्याने हात टेकले आणि म्हणाला “माफ कर भाऊ, हा माझा चहाचा कप नाही.”
व्हिडिओच्या शेवटी कार्लने पान मसाला “माउथ फ्रेशनर” आहे म्हणून समजावून सांगितले. त्यावर त्याचा एक मित्र हसतच म्हणाला “नाही रे, अजिबात नाही. मला तरी काही फ्रेशनिंग वाटलं नाही!”
हा व्हिडिओ जसजसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे, तसतशा त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पूर आला आहे.
1. एका वापरकर्त्याने मजेदार इशारा दिला – “कार्ल भाऊ, काळजी घ्या! उद्या तुमचे मित्र तेच पॅकेट मागतील.”
2. दुसऱ्याने विनोद केला – “पुढच्या वेळी तंबाखूही खाऊ घालणार का?”
3. आणखी एकाने गंमतीदार तुलना केली – “बंदर क्या जाने अदरक का स्वाद तसं झालंय!”
4. तर कुणीतरी म्हणालं – “आता बोला, जुबान केसरी!”
या व्हिडिओमुळे एक गोष्ट मात्र खरी ठरते भारतीय पदार्थ, मग तो पान मसाला असो, मसालेदार स्ट्रीट फूड असो किंवा चहाचा कप, हे परदेशी लोकांसाठी नेहमीच एक साहसी अनुभव ठरतो. भारताची खाद्यसंस्कृती जशी विविधतेने नटलेली आहे, तशीच तिची चवही अनेकांना थक्क करून जाते. कार्ल रॉकसारखे युट्यूबर जेव्हा भारतीय चव जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवतात, तेव्हा भारताची “मसालेदार ओळख” अजूनच जागतिक पातळीवर ठळकपणे समोर येते.
हे देखील वाचा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
सोशल मीडियावर गाजणारा हा व्हिडिओ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर तो भारताच्या “पान मसाला संस्कृतीची” झलकही दाखवतो. परदेशी लोकांना ते आवडो वा न आवडो, पण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या मजेदार प्रतिक्रिया पाहून भारतीय प्रेक्षक मात्र नक्कीच हसून लोटपोट झाले आहेत.