Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan airspace closure August 2025 : पाकिस्तानने पुन्हा एकदा अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अधिकृतरीत्या NOTAM (Notice to Airmen) जारी करण्यात आले असून या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अटकळींना उधाण आले आहे. पाकिस्तान नेमकं कोणत्या मोठ्या हालचालीची तयारी करत आहे, याबाबत कयास बांधले जात आहेत. भारताने अलीकडेच आपल्या स्वदेशी अग्नि-५ आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. त्यानंतर लगेच पाकिस्तानकडून हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, हा निर्णय भारताच्या लष्करी प्रगतीबाबतची असुरक्षितता व संभाव्य प्रतिउत्तर म्हणून पाहिला जात आहे.
पाकिस्तानने २२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ००:०० ते ०२:३० (UTC) या वेळेत इस्लामाबाद आणि नियंत्रण रेषा (LoC) परिसरातील हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या काळात कोणत्याही नागरी विमानाला या मार्गावरून उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हे पाऊल साधे “एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑपरेशन” नसून, लष्करी कारणास्तव उचलले गेलेले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी
इस्लामाबादप्रमाणेच दक्षिणेकडील लाहोर, कराची, रहिमयार खान आणि ग्वादरकडे जाणारे अनेक मार्ग २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ००:३० (UTC) पर्यंत बंद राहतील. यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळून जाणाऱ्या आणि अरबी समुद्रावरून होणाऱ्या नागरी विमान वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत. लष्करी तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानचा हा निर्णय संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी, ड्रोन-सराव किंवा हवाई संरक्षण यंत्रणांच्या तपासणीचा भाग असू शकतो.
ही घटना काही महिन्यांपूर्वीच्या तणावाची आठवण करून देते. २३ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. या कारवाईत भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संरचनांना लक्ष्य केले.
त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही भारतावर हल्ला चढवला. चार दिवस चाललेल्या या संघर्षानंतर युद्धबंदी जाहीर झाली. मात्र पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रावरील निर्बंध उठवले नाहीत.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, हवाई मार्ग बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे केवळ दोन महिन्यांत (२४ एप्रिल – ३० जून २०२५) पाकिस्तानला तब्बल ४.१० अब्ज पाकिस्तानी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. हवाई मार्गातून मिळणारे महसूल उत्पन्न, आंतरराष्ट्रीय उड्डाण शुल्क आणि विविध सेवा यांमधील उत्पन्न जवळपास थांबले आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी ही नुकसानकारक परिस्थिती आणखी गंभीर ठरली आहे.
भारताने क्षेपणास्त्र कार्यक्रमात मिळवलेली यशस्वी प्रगती, पाकिस्तानला निश्चितच अस्वस्थ करत आहे. भारत आज आपल्या स्वदेशी शस्त्रास्त्र क्षमतेत वेगाने प्रगती करत आहे, तर पाकिस्तान अजूनही आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे. हवाई मार्गांवरील बंदीचा फटका केवळ दोन्ही देशांना नाही, तर मध्यपूर्व आणि युरोपकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीलाही बसणार आहे. या घडामोडींवरून स्पष्ट दिसते की, पाकिस्तानच्या धोरणांमध्ये केवळ सुरक्षेची धास्ती नाही तर राजकीय दबाव निर्माण करण्याची मानसिकता दडलेली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
पाकिस्तानकडून हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय हा साधा एव्हिएशन संबंधी उपाय नसून, एक लष्करी व राजकीय संदेश आहे. क्षेपणास्त्र चाचणी असो वा संरक्षण सराव पाकिस्तान सध्या आंतरराष्ट्रीय पटलावर आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
तथापि, या निर्णयाचा आर्थिक तोटा आणि राजनैतिक परिणाम त्यांच्याच देशासाठी जास्त घातक ठरू शकतो.