
CET
MHT-CET 2026: नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या चर्चेनंतर आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या निकालावरून सोशल मीडियावर शंका व्यक्त केली जात आहे. ही शंका सीईटीमध्ये 99 ते 100 पर्सेंटाइल मिळालेल्या काही विद्यार्थ्यांचे बारावीतील गुण अत्यंत कमी असल्याचा दावा करणारा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यामुळे निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांनी या प्रक्रियेच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, ही व्हायरल इमेज चुकीची असल्याचे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असेही कक्षाने म्हटले आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काहींनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे एक गुणवत्ता यादी व्हायरल केली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सीईटीत 100 पर्सेंटाइल किंवा त्याच्या जवळपास गुण मिळाल्याचे दिसते आहे. पण यादीमधील त्याच विद्यार्थ्यांना बारावीत 50 ते 60 टक्के गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे गुणवत्ता यादीत फेरफार झाला का? डेटामध्ये छेडछाड झाली का? अशा स्वरूपाचे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या State Common Entrance Test 2025-26 ची टॉपर यादी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या सर्व नेत्यांनी पहावी.
या निकालात ७ विद्यार्थ्यांना १०० percentile मिळाले असून १३ विद्यार्थ्यांची percentile 99.999 आहे.
परंतु विशेष म्हणजे अनुक्रमांक १, २, ५, ९, १३ आणि १५ या… https://t.co/B0dFnQn2Uy — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 18, 2026
या पोस्टला अनेक लोकांच्या प्रतिक्रिया अढळल्या. ज्यामध्ये काहींनी ही गुणवत्ता यादी अधिकृत गृहीत धरून प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी नीटप्रमाणे सीईटी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच ‘मेरिटमध्ये काहीतरी गडबड आहे का?’ असा काहींनी प्रश्न उपस्थित केला.
या सर्व प्रकारानंतर सीईटी कक्षाने दिलेल्या स्पष्टीकरणात, व्हायरल झालेल्या इमेजची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार सीईटीच्या मूळ अस्थायी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या अॅप्लिकेशनच्या आयडीची सुरुवात ‘ईएन’पासून होते. व्हायरल पोस्टमध्ये ‘पीसीएम’ असे नमूद आहे. तसेच विद्यार्थ्यांचा प्रवर्ग, दहावी-बारावीचे गुण आणि सीईटी पर्सेंटाइल यामध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित इमेजला सीईटी कक्षाची कोणतीही मान्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नीट परीक्षेतील वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संवेदनशील वातावरण असल्याने सीईटीसारख्या चर्चा होणे साहजिक आहे. पण ही परीक्षा संगणकावर आधारित असल्याने असा घोटाळा होणे अशक्य आहे, असे सीईटी कक्षामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.