2,500 Pakistani soldiers resigned in a week due to poor security repeated attacks and economic decline
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या लष्कराला सध्या भीषण संकटांचा सामना करावा लागत आहे. सुरक्षा परिस्थिती ढासळल्यामुळे आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे लष्करातील सैनिक मोठ्या प्रमाणात सैन्य सोडून जात असल्याचे समोर आले आहे. एका आठवड्याच्या आत तब्बल 2,500 सैनिकांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. ही बाब पाकिस्तानसाठी गंभीर असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
पाकिस्तानमधील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमध्ये बंडखोर संघटना बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि इतर गटांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे लष्करात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच बलुचिस्तानमधील एका ट्रेनचे अपहरण करण्यात आले होते, जिथे प्रवास करणाऱ्या सैनिकांना लक्ष्य करण्यात आले. त्याचप्रमाणे नोश्की येथे लष्करी ताफ्यावरही मोठा हल्ला झाला होता. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जवान हुतात्मा झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kalpana Chawla Birthday : कल्पनेचे पंख, अवकाशाचा स्पर्श! वाचा कल्पना चावलाची आकाशगंगा प्रवासकथा
पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. आर्थिक अनिश्चिततेमुळे लष्कराला पुरेसा निधी मिळत नसल्याचे बोलले जाते. यामुळे सैनिकांना योग्य सुविधा मिळत नाहीत, तसेच वेतन आणि इतर लाभांमध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा स्थितीत जीव धोक्यात घालण्यापेक्षा अनेक सैनिकांनी सैन्य सोडून परदेशात स्थलांतर करणे पसंत केले आहे. यातील बहुतेक सैनिक सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे जाऊन मजूर म्हणून काम करत आहेत.
सैनिकांच्या मोठ्या संख्येने पलायनामुळे पाकिस्तानच्या लष्कराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युद्धजन्य परिस्थिती असताना सैनिक लढण्यास तयार नाहीत, ही पाकिस्तानसाठी गंभीर बाब आहे. वाढत्या असुरक्षिततेमुळे सैनिकांचे मनोबल खचले असून, लष्कराचा आत्मविश्वासही ढासळत चालला आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानच्या सुरक्षेवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
या मोठ्या घटनेबाबत पाकिस्तानातील मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सरकारी यंत्रणा पूर्णपणे गप्प आहेत. अधिकृतपणे पाकिस्तानी लष्करानेही यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय सूत्रांकडून आणि काबूल फ्रंटलाइनच्या अहवालानुसार, ही माहिती सत्य असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तानसाठी हा गंभीर इशारा असून, जर लष्करातील सैनिकांचे पलायन असेच सुरू राहिले, तर देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
पाकिस्तानी लष्कराच्या अशा स्थितीचा भारतावर काय परिणाम होईल, याकडेही तज्ज्ञांचे लक्ष आहे. पाकिस्तानच्या लष्कराच्या दुर्बलतेचा फायदा काही अतिरेकी संघटना उचलू शकतात, त्यामुळे भारतानेही सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, पाकिस्तानची आंतरिक अस्थिरता भविष्यात शेजारील देशांवर काय परिणाम करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दहशतवादाविरोधात अमेरिका आणि रशिया एकत्र; दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक
पाकिस्तानी लष्करासमोर आजवर न भोगलेले संकट उभे ठाकले आहे. सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे सैनिक मोठ्या प्रमाणात सैन्य सोडून जात आहेत. हे संकट लवकर न सुटल्यास पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेवर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे. लष्कराच्या सामर्थ्यावर उठलेले हे प्रश्नचिन्ह भविष्यात आणखी गंभीर होऊ शकते.