A 1993 CIA report warned of a possible India-Pakistan war over Kashmir
India Pakistan war warning : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उच्चांक गाठत असताना, अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सीआयए (CIA) चा १९९३ सालचा गुप्त अहवाल प्रकाशात आला आहे. या अहवालात भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य संघर्ष, विशेषतः काश्मीरच्या मुद्यावरून उद्भवणाऱ्या युद्धाचे संकेत दिले गेले होते. ब्रूस रिडेल यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या राष्ट्रीय गुप्तचर अंदाज (National Intelligence Estimate – NIE) या दस्तऐवजात पाकिस्तानकडून भारताला कायमचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या शांततामय पर्यटन स्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांनी प्राण गमावले. हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाच्या मुखवटा संघटनेने – द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने घेतली आहे. या घटनाक्रमाने ३२ वर्षांपूर्वीच्या CIA च्या इशाऱ्याची गंभीरता पुन्हा अधोरेखित केली आहे.
१९९३ मध्ये तयार झालेल्या NIE अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, “पाकिस्तान भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीला घाबरतो”. हा धोका फक्त लष्करी नाही, तर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्थैर्याच्या बाबतीतही आहे. पाकिस्तानने भारतासोबत थेट युद्ध न करता दहशतवादाच्या माध्यमातून प्रॉक्सी वॉर लढण्याचे धोरण अवलंबले आहे. अहवालात हेही नमूद आहे की पाकिस्तान इस्लामचा वापर धार्मिक श्रद्धा म्हणून नव्हे, तर शस्त्र म्हणून करतो. अशा प्रकारे कमी खर्चात जास्त परिणामकारकता मिळवण्याच्या मानसिकतेने पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारत युद्ध भडकवणार नाही…’ पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा सल्ला, पाकिस्तानच्या भूमिकेवरही भाष्य
पहलगाम हल्ल्याने CIA च्या अंदाजाची पुष्टी झाली आहे. TRF ही संघटना लष्कर-ए-तोयबाच्या पाठबळावर चालते, जी पाकिस्तानच्या ISI आणि लष्कराच्या सक्रिय मदतीने कार्यरत आहे. अहवालात भाकीत केले गेले होते की, अशा हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये थेट संघर्ष उद्भवू शकतो.
१९९३ मध्ये पाकिस्तान राजकीय अस्थैर्य, आर्थिक संकट आणि लष्करी हस्तक्षेप यांचा सामना करत होता. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. आर्थिक दिवाळखोरी, राजकीय उलथापालथ आणि आंतरराष्ट्रीय एकाकीकरण यामुळे पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र म्हणून ओळखले जात आहे. दुसरीकडे, भारताची प्रगती पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. आजही भारत जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून उदयास येत आहे, तर पाकिस्तान मागे पडत आहे.
१९९३ च्या NIE अहवालाचा उद्देश व्हाईट हाऊस, स्टेट डिपार्टमेंट आणि अन्य धोरणकर्त्यांना सतर्क करणे हा होता. CIA ने पाकिस्तानच्या धोरणाबाबत अनेक इशारे दिले, मात्र पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर वारंवार सूट मिळत राहिली. अमेरिकेने हॉटलाइन यंत्रणा, अणुकरार आणि विश्वास निर्माण करणारे उपाय सुचवले होते. मात्र, संकटाच्या वेळी हे उपाय अपुरे ठरले. आजही पहलगामसारख्या घटनांमुळे हे उपाय फोल ठरत असल्याचे स्पष्ट दिसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : खलिफा एर्दोगानचा भारतविरोधी कट? तणावाच्या काळात तुर्की गुप्तचर प्रमुख पाकिस्तान दौऱ्यावर
CIA चा ३२ वर्षांपूर्वीचा अहवाल दहशतवादाच्या भारतातील वाढत्या घटनांवर अचूक प्रकाश टाकतो. भारत-पाकिस्तानमधील तणावाला कारणीभूत असलेल्या काश्मीर प्रश्नाचे मूळ आणि पाकिस्तानच्या छुप्या युद्धनीतीचे धोकादायक परिणाम या अहवालाने अधोरेखित केले आहेत. आज जे काही घडते आहे, ते केवळ अचानक किंवा अनपेक्षित नाही – तर दशकांपूर्वीच चेतावणी देण्यात आलेले संकट प्रत्यक्षात येत आहे. भारताने यापुढे या प्रकारच्या छुप्या युद्धाला अधिक चोख आणि रणनीतिक उत्तर देण्याची गरज आहे.