after two years the accused in the attack on the Japanese Prime Minister was sentenced
टोकियो: जपानचे माजी पंतप्रधान फुमिया किशिदा यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला आज शिक्षा मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून रयूजी किमुरा असे याचे नाव आहे. वाकायामा जिल्हा न्यायालयाने बुधवारी (19फेब्रुवारी) ही शिक्षा जाहीर केली. त्याला पाच वेगवेगळ्या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले आहे.
दोन वर्षापूर्वी केला होता हल्ला
मीडिया रिपोर्टनुसार, 15 एप्रिल 2023 रोजी वाकायामा शहरात एका निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान किशिदा यांच्यालक स्मोक बॉम्बने हल्ला केला होता. या हल्ल्यात पंतप्रधान थोडक्यात बचावले होते, मात्र, दोन लोक जखमी झाले होते. घटनास्थलीच पोलिसांनी आरोपी किमुराला ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बॅगेतून चाकू देखील जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीला झालेल्या खटल्यात किमुराने खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाला नकार दिला होता. त्याने पंतप्रधान किशिदा यांना मारण्याचा हेतू नसल्याचा दावा केला होता.
निवडणुक प्रचारादरम्यान स्फोट
मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान किशिदा यांच्यावर हल्ला झाल त्यावेळी ते, जपानच्या लोकसभेच्या उप-निवडणुकीसाठी प्रचार करत होते. किशिदा वाकायामा शहरातील एका प्रचार रॅलीत भाषण देत होते.
दरम्यान याच वेळी 15 एप्रिल 2023 रोजी स्फोट झाला. मात्र, स्फोटानंतरही किशिदा यांनी भाषण पूर्ण केले. त्यांनी म्हटले की, “आम्ही निवडणूक प्रचाराच्या मध्यभागी आहोत. आम्हाला हा प्रचार सुरू ठेवायला हवा.”
यापूर्वीही माजी पंतप्रधानांवर झाले होते हल्ले
यापूर्वी, 8 जुलै 2022 रोजी, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरही निवडणूक प्रचारावेळी हल्ला झाला होता. आबे नारा शहरात प्रचार रॅलीत भाषण देत असताना एका 42 वर्षीय हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला होता. हल्लेखोराने हाताने बनवलेल्या गनने हा हल्ला केला होता.
गोळीबारानंतर छायाचित्रांमधून उघडकीस आले की, ही गन कॅमेऱ्यासारखी दिसण्यासाठी काळ्या पॉलिथीनने झाकलेली होती. हल्लेखोर छायाचित्र काढण्याच्या बहाण्याने आबे यांच्या जवळ आला आणि दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आबे यांचा मृत्यू झाला होता.
जपानी नेत्यांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह
या घटना जपानसाठी मोठ्या धक्कादायक ठरल्या असून नेत्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. किशिदा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जपानमधील राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.