'लुला दा सिल्वा यांना विष देण्याचे षड्यंत्र'; ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप, नेमंक प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ब्राझिलिया: ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर मोठे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर सत्तापालटाचा कटात सहभागी असल्याचा गंभीर आरोप असून देशाचे अभियोक्ता पाउलो गोनेट यांनी 2022 च्या निवडणुकीतील पराभवानंतर सत्ता कायम ठेवण्यासाठी हा कट रचला असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कटात सध्याचे अध्यक्ष लुइझ इनासियो लूला दा सिल्वा यांना विष देऊन मारण्याची व सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एलेक्झांद्रे डि मोरेस यांची हत्या करण्याची योजना असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बोल्सोनारोविरुद्ध २७२ पानांचे आरोपपत्र
अभियोजन पक्षाने हा दावा केला असून त्यांच्या, या कटाला “ग्रीन अँड येलो डॅगर” असे नाव देण्यात आले होते. हा कट राष्ट्रपती भवनात आखण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. 272 पानांच्या आरोपपत्रात पाउलो गोनेट यांनी नमूद केले की, या योजनेबद्दल बोल्सोनारो यांना माहिती होती व त्यांनी त्यास मंजुरी दिली होती.
यापूर्वी, नोव्हेंबर 2022 मध्ये ब्राझीलच्या संघीय पोलिसांनी या कटाबाबत 884 पानांची रिपोर्ट तयार केली होती. या रिपोर्टनुसार, बोल्सोनारो व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल संशय निर्माण करण्याचा, वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा व राजधानीत दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला होता.
सर्वोच्च न्यायालयाचा चौकशीचा आदेश
सध्या ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने या आरोपांची तपासणी सुरु असल्याचे म्हटले आहे. आरोप कोर्टाने ग्राह्य धरल्यास बोल्सोनारो यांच्यावर न्यायालयीन खटला चालवण्यात येऊ शकतो. मात्र, बोल्सोनारो यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “मला या आरोपांची अजिबात चिंता नाही.” तसेच त्यांनी सत्तापलटाच्या कोणत्याही आदेशाबद्दल माहिती नसल्याचा दावाही केला आहे.
बोल्सोनारोंसोबत 33 सहयोगींवर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, बोल्सोनारो यांच्यासह आणखी 33 सहयोगींवर आरोप करण्यात आले आहे. या आरोपांमध्ये सत्तापलटाचा कट रचणे, हिंसक गुन्हेगारी संघटनेत सहभागी होणे, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणे व सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांचा समावेश आहे.
या कटात बोल्सोनारो यांचे माजी उपाध्यक्ष जनरल ब्रागा नेटो यांचाही समावेश असल्याचे अभियोजन पक्षाने सांगितले आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे की या सर्वांवर खटला चालवला जाईल की नाही.