सर्व बंडखोर गट सीरियन लष्कराचा भाग बनणार; HTS प्रमुखाचे मोठे वक्तव्य, कशी असेल नवीन राजवट?
दमास्कस: सीरियामध्ये सध्या मोठए राजकीय बदल घडत आहेत. बशर अल-असद यांच्या सरकारच्या सत्तापालटानंतर आता देशाचे नेतृत्व हयात तहरीर अल-शाम (HTS)या संघटनेचे प्रमुख अहमद अल-जुलानी करत आहेत. सध्या सीरियाची नवीन राजवट कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असद सरकारविरोधात अनेक बंडखोर गटांनी HTS च्या नेतृत्वाखाली लढा दिला होता. मात्र, आता या गटांमधील मतभेदांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अल-जुलानी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
सर्व गटांना एकत्र विलिन करणार – अल-जुलानी
मिळावलेल्या माहितीनुसार, अल-जुलानी यांनी जाहीर केले आहे की, सीरियामधील सर्व सैन्य गटांना एकत्रित करून त्यांचे विलयन नवनिर्मित सीरियन सैन्यात केले जाईल. या सैन्याचे नेतृत्व देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडे असेल. यासाठी त्यांनी मुरहफ अबू कासरा यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. लेबनॉनमधील ‘अल-मायदीन’ या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, सीरियाच्या नवीन सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर HTS शी संबंधित व्यक्तींना नियुक्त केले गेले आहे.
सर्वांसाठी प्रतिनिधित्वाचे आश्वासन
अहमद अल-शरा यांनी त्यांच्या एका मुलाखतींमध्ये स्पष्ट केले आहे की, नवीन सीरियन सरकारमध्ये देशातील सर्व वर्ग, समुदाय आणि अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यात येईल. तसेच त्यांनी देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे आश्वासनही दिले आहे. मात्र, सत्तापालटानंतरही देशात पूर्ण शांती प्रस्थापित झालेली नाही. गोलान हाइट्स परिसरात इस्त्रायलने कब्जा केला आहे. तसेच कुर्द फोर्सच्या नियंत्रणाखालील भागांत अजूनही संघर्ष सुरू आहेत.
इस्त्रायलविषयी अल-जुलानी यांची भूमिका
इस्त्रायलच्या आक्रमणाबाबत विचारले असता अल-जुलानी यांनी सांगितले की, सध्या इस्त्रायलविरुद्ध युद्ध करण्याचा योग्य काळ नाही. सीरियाच्या जनतेला दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर आता शांततेची गरज आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, इस्त्रायलविरुद्ध सीरियाची जमीन लाँचिंग पॅड म्हणून वापरली जाणार नाही, याची ग्वाही दिली आहे.
नवीन नेतृत्वाकडून अनेक विकासाच्या अपेक्षा
नवीन नेतृत्वाखालील या सरकारकडून सीरियामध्ये स्थैर्य आणि विकासाची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, अनेक तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, विविध बंडखोर गटांना एका छत्राखाली आणणे आणि त्यांच्यातील मतभेदांवर मात करणे, हे अल-शरा यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.
अल-जुलानी दहशतवादी नाही – अमेरिका
सीरयातील बंडखोर गट हयात तहरीर अल शाम (HTS) च्या प्रमुखाला म्हणजेच अल-जुलानीला अमेरिकेने दहशतवाद्याच्या यादीतून काढून टाकले आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अल-जुलानी आता दहशतवादी नसून त्याच्यावर ठेवलेला 85 कोटी रुपयांचे बक्षिसही मागे घेण्यात आले आहे. अमेरिकेचे सहायक विदेश मंत्री बारबरा लीफ यांनी सीरियातील HTS नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.