Bangladesh changed its visa policies for Pakistani citizens
ढाका-इस्लामाबाद: एकीकडे बांगलादेशचे भारताशी संबंध बिघडत असताना दुसरीकडे पाकिस्तानशी मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापित करत आहे. यासाठी बांगलादेश सकारात्मक दिशेने पाउले उचलत असून त्यांनी पाकिस्तान नागरिकांसाठी व्हिसा धोरणांमध्ये बदल केले आहेत. हा निर्णय पाकिस्तानच्या बांगलादेशचे उच्चायुक्त इकबाल हुसैन खान यांनी लाहोर चेंबर ऑऱ कॉमर्स अँड इंडस्ट्री (LCCI) येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला आहे. लाहोर चेंबरमध्ये व्यापारिक नेत्यांना संबोधित करताना इकबाल हुसैन खान यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी बांगलादेश सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ केली आहे.
व्यापारवाढीवर भर
LCCI अध्यक्ष मियां अबजुर शाद यांनी बांगलादेशी उच्चायुक्तांचे स्वागत केले आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षाय व्यापारवाढीवर भर दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2023-24 च्या काळात बांगलादेश आणि पाकिस्तानमधील व्यापार 718 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला होता. यामध्ये सर्वाधिक पाकिस्तानचा निर्यात वाटा 661 दशलक्ष होता तर आयातीमध्ये फक्त 57 दशलक्ष डॉलर्स खर्च झाला. सध्याच्या घडीला आर्थिक वर्षात पाहिल्या पाच महिन्यांत हा आकडा 314 दशलक्ष डॉलर्सवर पोहचण्याची शक्यता आहे. तर इकबाल हुसैन यांनी माहिती तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स, तांदूळ, शस्त्रक्रिया उपकरणे आणि ऑटोमोबाईल पार्ट्स यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये व्यापारवाढीच्या संधींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.
संबंध सुधारण्याची भूमिका
बांगलादेशाचे अंतरिम प्रमुख सल्लागार मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या दशकभरात या दोन देशांतील संबंध फारसे समाधानकारक राहिले नाहीत. इकबाल हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 180 दशलक्ष लोकसंख्या असलेला बांगलादेश हा पाकिस्तानसाठी महत्त्वाची बाजारपेठ असू शकते असे म्हटले आहे.
SAARC च्या पुनरुज्जीवनावर भर
दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना (SAARC) पुनरुज्जीवित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. दक्षिण आशियातील व्यापार व सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी या संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर क्षेत्रीय सहकार्य वाढत असले तरी दक्षिण आशियाला अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इकबाल हुसैन यांनी नव्या पिढीला संधी उपलब्ध करून देणे आणि व्यापारातील अडथळे दूर करणे ही दोन्ही देशांची जबाबदारी असल्याचे नमूद केले. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांना नवीन उभारी मिळण्याची शक्यता आहे.