"शेख हसीनाला दिल्लीतून...'; बांगलादेशचे भारताबाबत मोठे वक्तव्य
ढाका: बांगलादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून त्यांनी भारताला रिमांडर पाठवले होते. आता पुन्हा एकदा बांगलादेशाने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन भारताबाबत आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी शेख हसीनांच्या प्रत्यर्पण आणि भारत, अमेरिका, तसेच चीनसोबत मजबूत द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करणे हे अंतरिम सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.
5 ऑगस्टपासून शेख हसीना भारतात
शेख हसीना यांची 16 वर्षांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर भारतात 5 ऑगस्टपासून आश्रय घेतला आहे. त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आंदोलनामुळे सरकार कोसळली होती. त्यांच्या देश सोडून जाण्यानंतर बांगलादेशात हिंसाचार सुरुच होता. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. सध्या बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) हसीना व त्यांच्या सहकाऱ्यांवर मानवतेविरोधी गुन्हे आणि नरसंहाराचे आरोप ठेवत अटक वॉरंट जारी केले आहे.
भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा विचार
हुसैन यांनी म्हटले आहे की, हसीनांच्या प्रत्यर्पणासोबतच, भारताशी मजबूत संबंध प्रस्थापित करण्यासाठीही ढाका एकत्रितपणे काम करत आहे. तसेच, “दिल्लीमधून हसीनांना परत आणण्याचे प्रयत्न आणि भारताशी चांगले संबंध ठेवण्याचे आमचे धोरण एकत्र चालेल.” याशिवाय, हुसैन यांनी यावरही भर दिला की रोहिंग्या संकटाचा समाधान शोधणे, तसेच अमेरिका, भारत, आणि चीन यांसारख्या प्रमुख देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे 2025 मध्ये बांग्लादेशचे मुख्य उद्दिष्ट असेल.
हुसैन यांनी असेही स्पष्ट केले की, कोणत्याही देशाला विशेष प्राधान्य देण्यापेक्षा तीन देशांसोबत समान संबंध राखले जातील, कारण त्यांचे विविध हित बांगलादेशशी गुंतलेले आहेत. अंतरिम सरकारने अलीकडेच नवी दिल्लीला शेख हसीनांच्या प्रत्यर्पणाची औपचारिक मागणी केली आहे आणि भारताच्या उत्तराची वाट पाहत आहे. हुसैन यांनी असा विश्वास व्यक्त केला की, वर्षाच्या अखेरीस बांगलादेश आणि या जागतिक शक्तींमधील संबंध आणखी मजबूत होतील.
देशाच्या हितासाठी भारत, अमेरिका आणि चीन चांगले संबंध हवेत
बीजिंग दौर्याच्या संदर्भात देखील त्यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटले की, 20 जानेवारीला चीनला भेट देऊन सामायिक मुद्द्यांवर चर्चा होईल. मात्र, त्यांनी विशिष्ट मुद्द्यांवर भाष्य केले नाही. म्यानमारच्या रखाइन प्रदेशातील बदललेल्या परिस्थितीवर विचारले असता, हुसैन यांनी सांगितले की ढाका ही नव्याने उद्भवलेली परिस्थिती स्वीकारत आहे, परंतु याचा योग्य प्रतिसाद शोधला जाईल. हुसैन यांनी सांगितले की, बांगलादेशच्या हितासाठी भारत, अमेरिका आणि चीनसारख्या देशांशी संबंध टिकवणे अत्यावश्यक आहे.