इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांचा संसदेतून राजीनामा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसलेम: माजी इस्रायली संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. गॅलंट यांनी अनेक वेळा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या अति उजव्या सरकारच्या धोरणांना विरोध केला होता. त्यामुळे त्यांना नोव्हेंबरमध्ये संरक्षणमंत्री पदावरून हटवण्यात आले होते. सध्या त्यांच्या या निर्णयाने इस्त्रायल राजकारणात खळबळ उडाली असून जगभर सर्वत्र चर्चा होत आहे.
गॅलंट यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा करताना म्हटले की, “जसे युद्धभूमीवर निर्णय घ्यावे लागतात, तसेच सार्वजनिक सेवेतही काही क्षण येतात, जेव्हा थांबावे लागते, परिस्थितीचे मूल्यांकन करावे लागते आणि योग्य दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो.” त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
नेतान्याहूंच्या अनेक धोरणांवर गॅलट यांची टीका
गॅलंट यांनी अनेक मुद्द्यांवर नेतान्याहूंच्या धोरणांवर टीका केली होती. विशेषतः, अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू लोकांना लष्करी सेवेपासून दिल्या जाणाऱ्या सूटविषयी त्यांनी विरोध दर्शवला होता. मार्च 2023 मध्ये, गॅलंट यांनी नेतान्याहू सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारकपातीच्या वादग्रस्त प्रस्तावाला विराम देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले, मात्र त्यांची ही कारवाई जनतेच्या तीव्र संतापाचा कारण ठरली. देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली, यामुळे नेतान्याहूंना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
गॅलंट विरोधात अटक वॉरंट
याशिवाय, गॅलंट आणि नेतान्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने गाझा संघर्षातील कथित युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांबद्दल अटक वॉरंट जारी केले आहे. या आरोपांवर इस्रायलने आक्षेप नोंदवला आहे आणि त्यांचा विरोध दर्शवला आहे.गॅलंट यांच्या निवृत्तीने इस्रायली राजकारणात मोठा धक्का बसला आहे. योव गॅलंट देशाच्या संरक्षण धोरणांवरील भूमिका अनेकदा प्रामाणिक व ठोस मानली जात असे.
गॅलंट यांच्या समर्थकांमध्ये असंतोषाची भावना
तसेच गॅलंट यांनी नेतान्याहू सरकारच्या अनेक धोरणांना कडाडून विरोध केला होता, ज्यामुळे ते सार्वजनिक जीवनात एक महत्त्वाचा आवाज ठरले होते. गॅलंट यांच्या निवृत्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोषाची भावना दिसून येत आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट एका वादग्रस्त आणि संघर्षमय कालखंडात होत आहे. नेतान्याहू सरकारच्या अति उजव्या धोरणांवर आणि देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर गॅलंट यांची भूमिका कायम चर्चेत राहणार आहे.