Bangladesh's Jamaat-e-Islami proposes China to establish an independent Arakan State
ढाका : दक्षिण आशियात युद्धसदृश वातावरणात आणखी एक नवीन संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशातील कट्टरपंथी इस्लामिक पक्ष जमात-ए-इस्लामी ने चीनकडे रोहिंग्या मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे. हा नवीन देश अराकान राज्यात उभारण्याची मागणी करण्यात आली आहे, जो सध्या अराकान आर्मीच्या ताब्यात आहे.
बांगलादेशातील पाकिस्तान समर्थक जमात-ए-इस्लामी पक्षाने ढाका येथे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना हा प्रस्ताव मांडला. चिनी प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व पेंग शिउबिन यांनी केले. या बैठकीत जमातचे वरिष्ठ नेते सय्यद अब्दुल्ला मोहम्मद ताहेर उपस्थित होते. बैठकीनंतर ताहेर यांनी सांगितले की, “बांगलादेशात सध्या ११ ते १२ लाख रोहिंग्या अत्यंत अमानवी परिस्थितीत राहत आहेत. त्यांच्यासाठी अन्नधान्य आणि कपडे पुरवणे हा शाश्वत उपाय नाही. त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र अराकान देशाची स्थापना गरजेची आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानने खोदली स्वतःचीच कबर! सिंधपासून ते कराचीपर्यंत गोंधळ; 30 हजार ट्रक आणि टँकरने राष्ट्रीय महामार्ग ठप्प
जमातच्या म्हणण्यानुसार, चीनचे म्यानमारशी घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यामुळे चीन अराकान राज्य स्वतंत्र करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतो. चिनी नेत्यांनी जमातला आश्वासन दिले की हा प्रस्ताव बीजिंगपर्यंत पोहोचवला जाईल. या बैठकीत तिस्ता प्रकल्प, पद्मा नदीवरील दुसऱ्या पुलाच्या बांधकामाबाबत आणि बांगलादेशातील बंदर विकासासाठी चीनच्या गुंतवणुकीची मागणीही करण्यात आली. भारताने तिस्ता प्रकल्पात चीनच्या सहभागाला आधीच तीव्र विरोध दर्शवला आहे.
यापूर्वीही वृत्त आले होते की, बांगलादेशात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय सक्रिय झाली असून, ती रोहिंग्या मुस्लिमांना लष्करी प्रशिक्षण देत आहे. असेही मानले जाते की, बांगलादेशचे काही गट रोहिंग्यांच्या नावाखाली म्यानमारवर हल्ल्याची तयारी करत आहेत. या घडामोडीमुळे भारतासाठीही चिंता वाढली आहे. भारताच्या ईशान्य सीमांचे म्यानमार आणि बांगलादेशाशी जवळचे भूगोलशास्त्रीय संबंध आहेत. त्यामुळे या संभाव्य संघर्षाचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. पूर्वोत्तर भारतातील अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.
जमात-ए-इस्लामीने चिनी नेत्यांसोबत प्रादेशिक सुरक्षेबाबतही चर्चा केली, असे समजते. यात त्यांनी भारतासोबत असलेल्या तणावांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. जमात भारताविरुद्ध सातत्याने आक्षेपार्ह भूमिका घेत आहे. चीननेही जमातच्या काही नेत्यांना चीनमध्ये आमंत्रित करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे प्रादेशिक तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
म्यानमारमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धात अशाप्रकारे बाह्य हस्तक्षेप आणि विभाजनाच्या मागण्या वाढल्यास, संपूर्ण दक्षिण आशियातील स्थैर्य धोक्यात येऊ शकते. यामुळे भारतासाठी नवीन धोके निर्माण होण्याची शक्यता आहे आणि एकीकडे म्यानमार, तर दुसरीकडे बांगलादेश सीमेवर भारताला दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack : भारताने युद्धाची दिशा बदलली; पाकिस्तानच्या कराची बंदरावर Fighter jets तैनात
जमात-ए-इस्लामीने चीनसमोर ठेवलेला प्रस्ताव केवळ म्यानमारसाठीच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी नवीन संकट निर्माण करणारा आहे. भारतासाठीही या घडामोडीकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणे आणि सुरक्षेची रणनीती अधिक मजबूत करणे आवश्यक बनले आहे.