Sindh truck blockade : पाकिस्तान सध्या स्वतःच्या चुकीच्या धोरणांमुळे गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भारताने नुकतेच सिंधू पाणी करार रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली आहे, परंतु सिंध प्रांतातील अंतर्गत गोंधळामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. सिंधमध्ये सिंधू नदीत नवीन कालवा खोदण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलन पेटले आहे. या आंदोलनामुळे सुमारे ३० हजार ट्रक आणि तेल टँकर राष्ट्रीय महामार्गांवर अडकले आहेत. त्यामुळे संपूर्ण सिंध प्रदेशात अन्न, पाणी आणि इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कारखाने थंडावले, बंदरांवर कंटेनर रचले
सिंधमधील मुख्य रस्ते जसे की सुक्कुर, खैरपूर, काश्मोर आणि कंधकोट येथे आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. व्यावसायिक वाहतूक ठप्प झाल्याने कारखान्यांचे उत्पादन थांबले असून, याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. कराची पोर्ट ट्रस्टमध्ये आयात आणि निर्यात माल वाहून नेणारे हजारो कंटेनर अडकले आहेत. जर अशी स्थिती आणखी काही दिवस टिकली, तर पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि महागाईचा स्फोट होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack : भारताने युद्धाची दिशा बदलली; पाकिस्तानच्या कराची बंदरावर Fighter jets तैनात
वाहतूकदार आणि कामगारांची बिकट अवस्था
ऑल पाकिस्तान गुड्स ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ९० हजार ते १ लाख लोक या वाहतुकीच्या गोंधळात अडकले आहेत. उष्णतेमुळे आणि आवश्यक सुविधांच्या अभावामुळे अन्न व पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यात अडकलेल्या ट्रक आणि टँकरमध्ये सुमारे १ कोटी रुपयांचा माल रस्त्यावर पडून आहे. अनेक ठिकाणी उपासमारीची वेळ आली असून, ट्रक चालक आणि मदतनीस मोठ्या संकटात सापडले आहेत.
आंदोलन उग्र, वाहने पेटवली
निदर्शकांनी अनेक ठिकाणी वाहने जाळली, काही ट्रकांमध्ये प्राणीही होते, ज्यांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. सरकारकडून सर्व पक्षांची व वाहतूकदारांची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. परंतु अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास, देशाची पुरवठा साखळी पूर्णतः कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राजकीय पक्षांचा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ
सिंधमधील आंदोलनात विविध राजकीय पक्ष, वकील संघटना आणि नागरी समाज गट सक्रिय सहभागी झाले आहेत. सरकारने काम तात्पुरते थांबवले असले तरीही आंदोलनकर्ते मागे हटण्यास तयार नाहीत. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्यावर परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप होत आहे. तर मुख्यमंत्र्यांनी काही राजकीय पक्षांवर देशातील वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या भीतीने पाकिस्तानच्या आर्मी चीफ जनरल असीम मुनीरचे पलायन; शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयातून मिळाले संकेत
नजीकचे संकट, इंधन आणि अन्न टंचाई
ज्या वेगाने परिस्थिती बिघडते आहे, त्यामुळे देशभरात इंधनाचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानातील निर्यातदार संघटनांनी आणि उद्योग गटांनीही सरकारला इशारा दिला आहे की, जर दोन-तीन दिवसांत गतिरोध न सुटला, तर देशातील संपूर्ण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडेल.
पाकिस्तान स्वतःच्या संकटात गुरफटला
सध्याची परिस्थिती पाहता असे स्पष्ट होते की, भारताच्या निर्णयापेक्षा पाकिस्तानच्या अंतर्गत अस्थिरतेमुळेच देशाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सिंधमधील असंतोष आणि आंदोलनाच्या आगीत पाकिस्तानची अर्थव्यवस्था होरपळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. पाकिस्तानने ज्या हाताने आपली सुधारणा करायला हवी होती, त्या हातानेच तो स्वतःची कबर खोदताना दिसत आहे.