Berlin evacuates 10,000 after 80-year-old WWII bomb found
बर्लिनमध्ये दुसऱ्या महायुद्धातील ८० वर्षे जुना बॉम्ब सापडल्याने १०,००० लोकांना तातडीने घरे रिकामी करावी लागली.
मिट्टे जिल्ह्यात स्प्री नदीत आढळलेला बॉम्ब चिखलात पुरला होता, त्यामुळे स्फोटाचा धोका टळला.
दरम्यान स्पँडौ जिल्ह्यातील आणखी एक १०० किलोचा बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
WWII bomb Berlin : शांत आणि आधुनिकतेचा आव आणणाऱ्या युरोपच्या मध्यभागी गुरुवारी संध्याकाळी अचानक भीती आणि घबराट पसरली. कारण होते ८० वर्षांपासून न फुटलेला दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब! स्प्री नदीच्या गाळात आणि चिखलात पुरून ठेवलेला हा जीवघेणा स्फोटक पदार्थ अचानक कामगारांच्या नजरेस आला आणि क्षणार्धात संपूर्ण बर्लिनचा मिट्टे जिल्हा ‘हाय अलर्ट’वर गेला. पोलिसांनी ५०० मीटर सुरक्षा घेरा उभारला, रस्ते बंद केले, मेट्रो सेवा थांबवली आणि जवळपास १०,००० नागरिकांना तातडीने आपली घरे रिकामी करण्याचे आदेश दिले.
डीडब्ल्यूच्या वृत्तानुसार, रात्री अचानक पोलिस दार ठोठावत घरे रिकामी करत होते. “बाहेर या, तातडीने सुरक्षित स्थळी जा!” असे आदेश मिळताच नागरिक घाबरून बाहेर पडले. अनेकांनी आपली बॅग, औषधे आणि काही आवश्यक सामान एवढेच हातात घेऊन घरं सोडली. मिट्टे टाउन हॉलसमोर शेकडो लोक रांगेत उभे असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. थंडीच्या रात्री अचानक घराबाहेर पडावे लागल्याने अनेकांनी मुलांना कुशीत घेतले, वृद्धांना आधार देत सुरक्षित स्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांना आश्वस्त करत जवळच्या शाळेत व नगरपालिकेच्या इमारतीत आपत्कालीन निवारागृह उभारले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin : कोण सांभाळणार रशियन साम्राज्याची कमान? व्लादिमीर पुतिन यांनी जाहीर केली पुढील उत्तराधिकारी पदासाठीची योजना
हा बॉम्ब प्रत्यक्षात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हवाई हल्ल्याचा अवशेष असल्याचे सांगितले जाते. जर्मनीत अजूनही युद्धकाळातील शेकडो न फुटलेले बॉम्ब सापडतात, मात्र मिट्टे जिल्ह्यासारख्या राजधानीच्या मध्यवर्ती भागात असा शोध लागणे हे अत्यंत धक्कादायक होते. विशेष म्हणजे, हा बॉम्ब स्प्री नदीच्या चार मीटर खोलीवर गाळात पुरून गेला होता. त्यामुळे तो ८० वर्षे निष्क्रिय अवस्थेत राहिला. तज्ज्ञांच्या मते, चिखलाच्या थरामुळे स्फोटाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. तरीही तो बाहेर काढणे आणि निष्क्रिय करणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकले असते.
तणावपूर्ण रात्रीनंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी दिलासा दिला “बॉम्ब निकामी करण्याची गरज नाही.” कारण तो गाळात पूर्णपणे अडकलेला असल्याने त्याचा स्फोट होण्याचा धोका अत्यल्प आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा त्यांच्या घरात परतण्याची परवानगी देण्यात आली. या काळात थांबवण्यात आलेली मेट्रो लाईन २, नदीवरील बोटींची वाहतूक आणि प्रमुख रस्ते पुन्हा सुरु करण्यात आले. नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला.
मात्र बर्लिनची परीक्षा अजून संपलेली नाही. बुधवारी स्पँडौ जिल्ह्यात आणखी १०० किलोचा दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडला आहे. शुक्रवारी तो निष्क्रिय करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या भागातून तब्बल १२,४०० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जवळच्या एका जिमला तातडीचे निवारागृह बनवण्यात आले आहे. पोलिस आणि तज्ज्ञ सतत बॉम्बवर लक्ष ठेवून आहेत.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर मित्रराष्ट्रांनी लाखो टन बॉम्ब टाकले होते. त्यापैकी काही आजही जमिनीत, नद्यांमध्ये किंवा शहरांच्या गाभ्यात दडून आहेत. दरवर्षी देशात शेकडो ठिकाणी असे बॉम्ब सापडतात आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थलांतर करावे लागते. बर्लिनसारख्या आधुनिक शहराला अजूनही इतिहासातील या रक्तरंजित युद्धाची किंमत चुकवावी लागत असल्याची जाणीव कालच्या घटनेने पुन्हा करून दिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Geopolitics : पाकिस्तान-सौदी जवळीक जर संरक्षण ढाल; तर India-UAE करार भविष्याच्या गुंतवणुकीची वाटचाल
एका स्थानिक नागरिकाने डीडब्ल्यूशी बोलताना सांगितले :
“अचानक रात्री पोलिस दार ठोठावले, आणि आम्हाला घर सोडावे लागले. मुलं घाबरली होती, पण अधिकाऱ्यांनी शांतपणे समजावलं. आम्ही सुरक्षित स्थळी पोहोचलो, पण ती रात्र आयुष्यभर लक्षात राहील.”
एका वृद्धाने भावनिक स्वरात म्हटले :
“मी दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलो, पण त्या युद्धाचे बॉम्ब आजही माझ्या घराजवळून सापडतात, हे किती विचित्र आहे!”
शुक्रवारी सकाळी “All Clear” सिग्नल मिळाल्यानंतर नागरिक आपल्या घरात परतले. काहींनी पोलिसांचे आभार मानले, तर काहींनी अशा प्रसंगांनी सतत जगावे लागणाऱ्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. जर्मनीतील तज्ञांच्या मते, युद्धकाळातील न फुटलेल्या बॉम्बचा धोका अजून अनेक वर्षे कायम राहणार आहे. मात्र कालचा प्रसंग दाखवून गेला की इतिहास कधी कधी वर्तमानालाही हादरवतो!