Biden leaves for California after leaving the presidency
वॉशिंग्टन: एकीकडे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यपदाची सुत्रे हातात घेताच कामाला लागले असून त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयांनी अमेरिकेत आणि जगात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची सूत्रं सुपूर्द करताच त्यांचा कार्यकाळ 20 संपुष्टात आला आणि ते आपल्या कुटुंबीयांसोबत कॅलिफोर्नियाला रवाना झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीतून थोडीशी विश्रांती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, सोबतच आम्ही मैदान सोडलं नसल्याचंही त्यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 च्या निवडणुकीत हार झाल्याचे मान्य करण्यास नकार दिला होता.तसेच त्यांनी 2021 मध्ये जो बायडेन यांच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहून अध्यक्षपदाची सूत्रे हातात देण्याची परंपरा मोडीली होती. मात्र, बायडेन यांनी ही परंपरा कायम ठेवली. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांचे बायडेन दाम्पत्याने व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. 2020 सालच्या निवडणुकांनंतर या दोघांमधील वैर हे सर्वांसमोर स्पष्टच दिसत होते.
20 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी बायडेन हे ट्रम्प यांना “तुमचे स्वागत आहे” असे म्हणाले. दुपारच्या वेळी कार्यकारी अधिकारांचे हस्तांतरण आणि इतर औपचारिकता पार पडल्यानंतर बायडेन दाम्पत्य आपल्या लिमोसिन गाडीतून रवाना झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला सुरुवात होताच व्हाईट हाऊसचे कर्मचारीही कामाला लागले. त्यांनी जो बायडेन यांचे उरलेले सामान तिथून हटवण्यास सुरुवात केली.
शपथविधी पार पडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा बायडेन दाम्पत्याची भेट घेतली. यावेळी जो आणि जिल बायडेन हे हेलिकॉप्टरमधून जॉइंट बेस अँड्र्यूजवर जाण्याच्या तयारीत होते. याठिकाणी ते कर्मचाऱ्यांसोबत निरोप समारंभात सहभागी होणार होते. बायडेन यांनी यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. “कोणताही राष्ट्राध्यक्ष एक ऐतिहासिक क्षण निवडू शकत नाही. मात्र, तो अशी टीम नक्कीच निवडू शकतो ज्यांच्या मदतीने इतिहास घडेल आणि आम्ही सर्वोत्तम टीमची निवड केली” अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.
तसंच “आम्ही व्हाईट हाऊस सोडत आहोत, मात्र लढाई सोडत नाहीये” असं म्हणत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या संपर्कात राहण्याचं आवाहन केले. यानंतर ते एका विमानातून कॅलिफोर्नियाला रवाना झाले. काही काळ आपल्या कुटुंबीयांसमवेत आराम करण्याचा आपला विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.