अवघ्या 6 तासांत ट्रम्प यांनी घेतले 78 निर्णय; अमेरिकन राजकारणात पुन्हा एकदा खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची जबाबदारी स्वाकारल्यानंतर अनेक निर्णयांमध्ये बदल केला आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जोरदार पुनरागमन करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या काही निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अमेरिकेची भूमिका काय असे याचा ट्रेलर ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला दिला आहे. सत्तेवर येताच त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. ट्रम्प यांनी अवघ्या 6 तासांत 78 मोठे निर्णय घेतले आहे. त्यांनी जो बायडेन यांच्या अध्यक्षीय कार्यकाळतील ही काही महत्त्वाचे आदेश बलेले आहेत.
ट्रम्प यांनी बदलेले निर्णय
डोनाल्ड ट्रम्प शपथविधीनंतर कॅपिटल वन एरिना येथे पोहोचले आणि लोकांसमोर अनेक घोषणाही केल्या. मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी पॅरिस क्लायमेट अॅग्रीमेंटमधून अमेरिका बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातदेखील हा निर्णय घेतला होता, परंतु बायडेन यांनी तो पलटवला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिकेचे सदस्यत्वही मागे घेतले. यामुळे संघटनेच्या फंडिंगवर परिणाम होईल असे तज्ञांनी म्हटले आहे.
LGBTQ समुदायाशी संबंधित समानतेचे आदेशही रद्द करण्यात आले आहे. आता अमेरिकेत फक्त दोनच लिंग असणार फक्त स्त्री आणि पुरुष असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच कॅनडा आणि मेक्सिकोवर 1 फेब्रुवारीपासून 25% टॅरिफ लागू करण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी संघीय नोकरभरतीवर बंदी घातली असून, सर्व संघीय कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम बंद करून कार्यालयात काम करण्याचा आदेश दिला आहे.
अमेरिकेचे जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द
ट्रम्प यांच्या प्रमुख निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे परदेशी नागरिकांना जन्मत: मिळाणारे अमेरिकेचे नागरिकत्व ट्रम्प यांनी रद्द केले आहे. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होणार आहे.
कॅपिटल हिल हिंसा आणि दोषींची माफी
ट्रम्प यांनी 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या कॅपिटल हिल हिंसेशी संबंधित 1600 दोषींना माफी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यात प्राउड बॉयज ग्रुपचा नेता एनरिक टारियोचा समावेश आहे. याला 22 वर्षांची शिक्षा झाली होती.
पॅरिस क्लायमेट डील आणि WHO मधून बाहेर
पॅरिस क्लायमेट अॅग्रीमेंटमधून अमेरिका बाहेर काढत ट्रम्प यांनी पर्यावरण धोरणांबाबत कठोर भूमिका घेतली. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO) टीका करत पुन्हा एकदा अमेरिकेला त्यातून बाहेर काढले. त्यांच्या मते, WHO कोविड-19 महामारीच्या वेळी अपयशी ठरली होती.
क्यूबाला दहशतवाद प्रायोजक देशांच्या यादीत परत समाविष्ट
ट्रम्प यांनी क्यूबाला दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या यादीत परत टाकले. तसेच, दवावरील किंमती कमी करण्याच्या बायडेनच्या निर्णयाला पलटवत औषधांच्या किंमती नियंत्रित करण्याचे आदेश रद्द केले.
अमेरिका पुन्हा महान बनवण्याची घोषणा
शपथविधीनंतर ट्रम्प यांनी 30 मिनिटांचे भाषण दिले. त्यांनी अमेरिकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आश्वासन दिले आणि “अमेरिका पुन्हा महान बनेल” असा नारा दिला. ट्रम्प यांच्या या निर्णयांनी अमेरिकन राजकारणात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे.