
Brazil presidential election 2026 news Lula vs Flavio Bolsonaro TV radio ads
दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा देश असलेल्या ब्राझीलमध्ये (Brazil Elections) अध्यक्षीय निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता प्रचार मोहीम अत्यंत तीव्र आणि आक्रमक वळणावर पोहोचली आहे. डिजिटल आणि सोशल मीडियाचा प्रभाव जगभरात प्रचंड वाढलेला असला, तरी ब्राझीलमध्ये आजही टीव्ही आणि रेडिओ हेच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात मोठे आणि प्रभावी माध्यम मानले जाते. या पार्श्वभूमीवर, टीव्ही आणि रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या मोफत राजकीय जाहिरातींना सुरुवात झाली असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
या वेळची ब्राझीलची अध्यक्षीय निवडणूक दोन प्रमुख राजकीय प्रवाहांमधील भीषण संघर्षाचे प्रतीक बनली आहे. एका बाजूला डाव्या विचारसरणीचे नेते आणि ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा (Luiz Inácio Lula da Silva) हे आपल्या चौथ्या कार्यकाळासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला, उजव्या विचारसरणीच्या लिबरल पार्टीचे (PL) सिनेटर फ्लाविओ बोल्सोनारो (Flávio Bolsonaro) हे त्यांना तगडे आव्हान देत आहेत. फ्लाविओ बोल्सोनारो हे ब्राझीलचे माजी वादग्रस्त अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. जायर बोल्सोनारो यांना सत्तापालटाच्या प्रयत्नाप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे ते निवडणुकीसाठी अयोग्य ठरले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी फ्लाविओ यांच्या खांद्यावर आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flash Flood: आंतरराष्ट्रीय मदतीबाबत बालेन शाह यांचा मोठा निर्णय; भारत आणि चीनकडे आपत्कालीन याचना
राजकीय विश्लेषक आणि ब्राझीलच्या माजी मंत्र्यांच्या मते, ही निवडणूक प्रचारमोहीम ब्राझीलच्या इतिहासातील सर्वात आक्रमक आणि टोकाची ठरणार आहे. २०२२ मध्ये झालेली अध्यक्षीय निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली होती, ज्यामध्ये लुला यांनी जायर बोल्सोनारो यांचा अत्यंत निसटत्या मताधिक्याने पराभव केला होता. आता २०२६ च्या निवडणुकीत जायर बोल्सोनारो यांचे पुत्र फ्लाविओ हे आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि दक्षिणपंथी मतदारांना एकत्र आणण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर अत्यंत तिखट हल्ले चढवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ब्राझीलमधील निवडणूक नियमांनुसार राजकीय पक्षांना टीव्ही आणि रेडिओवरील जाहिरातींसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. तिथे राष्ट्रीय कायद्यानुसार मोफत वेळ दिला जातो. परंतु, हा वेळ पक्षाच्या आकारमानावर आणि कनिष्ठ सभागृहातील (Chamber of Deputies) त्यांच्या प्रतिनिधींच्या संख्येवर आधारित असतो. या नियमामुळे मोठ्या आणि आघाडीतील पक्षांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळतो. साओ पावलो विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, या व्यवस्थेमुळे श्रीमंत आणि गरीब पक्षांमधील संसाधनांची तफावत कमी होण्यास मदत होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mohan Bhagwat : न्यूयॉर्कमध्ये गुंजला सनातन धर्माचा आवाज; ‘पळून जाऊ नका, कर्तव्य करा!; RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान
नियम आणि वेळेच्या गणिताचा विचार केला तर, यात सध्या तरी अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी बाजी मारल्याचे दिसते. लुला आणि त्यांच्या महाआघाडीला दररोज ५ मिनिटे ३१ सेकंदांचा वेळ मिळाला आहे. याउलट, फ्लाविओ बोल्सोनारो यांच्या पक्षाला केवळ ४ मिनिटे २० सेकंद वेळ मिळाला आहे. फ्लाविओ यांना कमी वेळ मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे ते इतर मोठ्या राजकीय पक्षांना आपल्या गोटात खेचण्यात काहीसे अपयशी ठरले आहेत. २०१८ मध्ये त्यांच्या वडिलांनी ज्याप्रमाणे व्यापक आघाडी उभारली होती, तशी आघाडी उभारण्यात फ्लाविओ यांना अद्याप पूर्ण यश आलेले नाही.
पहिल्या टप्प्याचे मतदान ४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. जर या पहिल्या फेरीत कोणत्याच उमेदवाराला ५० टक्क्यांहून अधिक बहुमत मिळाले नाही, तर २५ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे (Runoff) मतदान होईल. दुसऱ्या फेरीत पोहोचणाऱ्या दोन्ही अंतिम उमेदवारांना टीव्ही आणि रेडिओवर प्रचारासाठी अगदी समान वेळ दिला जातो. तज्ज्ञांच्या मते, यावेळी टीव्ही जाहिरातींवर सोशल मीडियाचाही मोठा प्रभाव पाहायला मिळेल. कंटेंट क्रिएशन आणि व्हिडिओ रील्सच्या माध्यमातून तयार केलेला मजकूर आता टीव्ही स्क्रीनवरही वापरला जात आहे. त्यामुळे ब्राझीलची ही हाय-व्होल्टेज निवडणूक नेमकी कोणाच्या बाजूने कौल देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.