Canada Government lists transnational criminal organizations as terrorist entities
ओटावा: अमेरिकेनंतर आता कॅनडान देखील लॅटिन अमेरिकेतील संघटनांविरोधात कठोर पाऊल उचलेले आहे. कॅनडाने सात लॅटिन अमेरिकन गुन्हेगारी संघटनांना कायदेशीररित्या दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे फेंटेनाइल (Fentanyl) तस्करीवर नियंत्रण ठेवणे आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डेविड मॅकगिन्टी यांनी सांगितले की, या निर्णयामुळे कॅनडामधील कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल आणि फेंटेनाइलचा प्रसार रोखता येईल.
अत्यंत धोकादायक ड्रग
फेंटानाइक एक अत्यंत शक्तिशाली सिंथेटिक ओपिओइड आहे, हे मार्फिनच्या तुलनेत 80 पट आणि हेरॉइनच्या तुलनेत शेकडो पट जास्त शक्तिशाली असते. हे अत्यंत धोकादायक ड्रग असून याच्या अतिसेवनामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत देखील फेंटेनाइलच्या प्रसारावर कठोर कारवाई सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावरील कर (टॅरिफ) वाढवण्याचा इशारा दिला होता. ट्रम्प यांनी कॅनडाच्या उर्जाक्षेत्रावर 10% आणि इतर सर्व उत्पादनांवर 25% कर लावण्याचा इशारा दिला होता, मात्र सध्या 4 मार्चपर्यंत ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
या संघटनांना केले दहशतवादी घोषित
कॅनडाने सात लॅटिन अमेरिकन गुन्हेगारी गटांना दहशतवादी घोषित केले आहे. यामध्ये मेक्सिकोतील सिनालोआ कार्टेल, जलिस्को न्यू जेनरेशन कार्टेल, ला नुएवा फॅमिलिया मिचोआकाना, कार्टेल डेल गोल्फो, कार्टेल्स युनिडोस या संघटनांचा समावेश आहेत.
तसेच, व्हेनेझुएला येथील ट्रेन डी अरागुआ मारा, साल्वाट्रुचा (MS-13) हा गट कॅलिफोर्नियामध्ये स्थापन झाला पण अल साल्वाडोरमध्ये मोठा प्रभावशाली झाला. याचप्रमाणे, अमेरिकेने अलीकडेच 8 लॅटिन अमेरिकन गुन्हेगारी गटांना अधिकृतरित्या “परदेशी दहशतवादी संघटना” म्हणून घोषित केले आहे.
काय आहे प्रक्रिया?
कॅनडाl कोणत्याही संघटनेला दहशतवादी घोषित करण्यासाठी कठोर चौकशी केली जाते. मंत्री मॅकगिन्टी यांच्या मते, ही प्रक्रिया गुप्तचर अहवालांवर आधारित असते. एखाद्या संघटनेने जाणूनबुजून दहशतवादी कारवाया केल्या असतील, अशा कारवायांत सामील असतील किंवा त्यांना पाठिंबा दिला असेल, तर त्या गटांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात येते.
कॅनडाचे कमिश्न माईक ड्यूहेम यांनी सांगितले की, या कार्टेल गटांकडे मोठ्या प्रमाणावर संसाधने आहेत आणि ते कॅनडातही सक्रिय आहेत. काही कॅनडियन नागरिकांनी देखील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेत जाऊन तस्करीच्या प्रक्रियेत सहभाग घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सीमा सुरक्षा आणि नवीन उपाययोजना
यामुळे कॅनडाने सीमा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी 1.3 अब्ज कॅनेडियन डॉलर (910 दशलक्ष अमेरिकी डॉलर) खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नवीन हेलिकॉप्टर, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा कर्मचार्यांची भरती यांचा समावेश आहे. कॅनडा आणि अमेरिका दोन्ही देश फेंटेनाइलच्या तस्करीविरोधात कठोर पावले उचलत आहेत.
नवीन कायदे आणि परिणाम
कॅनडाच्या नवीन कायद्यांनुसार, कोणी या दहशतवादी संघटनांसोबत संबंध ठेवला, त्यांना मदत केली किंवा त्यांच्या कारवायांमध्ये सहभागी झाला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. यामुळे फेंटेनाइलचा प्रसार रोखण्यास मदत होईल आणि कॅनडा आणि अमेरिका दोन्ही देशांच्या नागरिकांचे रक्षण केले जाईल.