वॉशिंग्टन : कोरोना लस (Corona Vaccine) निर्मात्या मॉडर्ना (Moderna) कंपनीने फार्मास्युटिकल कंपन्या फायझर (Pfizer) आणि बायोएनटेक (BioNTech) यांच्यावर दावा दाखल केला आहे. मॉडर्नाने प्रतिस्पर्धी कंपन्यांवर आपल्या तंत्रज्ञानाची कॉपी (Technology Copy) केल्याचा आणि कोरोना लस बनवण्यासाठी पेटंट अधिकारांचे उल्लंघन (Infringement Of Patent Rights) केल्याचा आरोप आहे.
२०१० आणि २०१६ मध्ये एमआरएनए तंत्रज्ञानाअंतर्गत त्यांचे पेटंट होते, असे मॉडर्नाने एका निवेदनात म्हटले आहे. फायझर आणि बायोएनटेकने स्वतःची लस बनवण्यासाठी मॉडर्ना कंपनीच्या तंत्रज्ञानाची कॉपी केली. मॅसॅच्युसेट्स-आधारित कंपनी मॉडर्नाने आपल्या शहरात असलेल्या यूएस जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केला. बायोएनटेक ही कंपनी असलेल्या डसेलडॉर्फ या जर्मन शहरात आणखी एक खटला दाखल केला आहे.
मॉडर्नाचे प्रवक्ते ख्रिस्तोफर रिडले म्हणाले, कंपनीने अद्याप नुकसानीचे मूल्यांकन केलेले नाही. तर, फायझर आणि बायोएनटेकने या खटल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आम्हाला खात्री आहे की, आमची लस बौद्धिक संपदा कायद्याचे पालन करते, असे फायझरच्या प्रवक्त्या जेरिका पिट्स यांनी सांगितले.