
Tibet Flood News China Censorship RSF report on Tibet flood,
नैसर्गिक आपत्तींमध्ये जीवित आणि वित्तहानी होणे ही अत्यंत दुःखद बाब असली, तरी त्या आपत्तीचे वास्तव दडपून ठेवून केवळ स्वतःचा प्रचार करणे याहून मोठे पाप असू शकत नाही. तिबेटच्या स्वायत्त क्षेत्रात आलेल्या भीषण विनाशकारी पुरानंतर चीनने (China) हेच करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या या भागात आलेल्या पुराने किती भयानक विध्वंस घडवून आणला आहे, याचे वास्तववादी चित्र जगासमोर येऊ नये म्हणून चिनी प्रशासनाने डिजिटल आणि पत्रकारितेवर अत्यंत कडक निर्बंध लादले आहेत. पत्रकारितेच्या आंतरराष्ट्रीय हक्कांचे रक्षण करणाऱ्या ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ (RSF) या संस्थेने चीनच्या या संतापजनक आणि क्रूर सेन्सॉरशिपवर ताशेरे ओढले आहेत.
नेपाळमध्ये आलेल्या महापुराची आणि तिथल्या विनाशाची दररोज नवनवीन माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांद्वारे जगासमोर येत आहे. परंतु, शेजारीच असलेल्या तिबेटच्या भूमीवर नक्की काय घडले, याची तिळमात्र माहिती उपलब्ध नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (CCP) सेन्सॉरशिप यंत्रणेने तिबेटभोवती एक अशी भिंत उभी केली आहे, ज्यामुळे पूरग्रस्त भागातील खरी परिस्थिती, मदतीची गरज आणि जीवितहानीचा अचूक मागोवा घेणे पूर्णपणे अशक्य झाले आहे.
आरएसएफने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, चीन सरकारने कोणत्याही स्वतंत्र तिबेटी माध्यम संस्थेला किंवा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला पूरग्रस्त भागात जाण्याची परवानगी दिलेली नाही. केवळ कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचार विभागाच्या (Propaganda Department) थेट मार्गदर्शक तत्त्वांवर काम करणाऱ्या सरकारी वृत्तसंस्थांनाच तिथे जाण्याची सवलत देण्यात आली आहे. हे चिनी वृत्तपत्रे आणि वाहिन्या केवळ सरकारचे मदतकार्य किती उत्तम सुरू आहे याचेच चित्र रेखाटत आहेत, परंतु प्रत्यक्षात किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि किती जण वाहून गेले, यावर पूर्णपणे मौन बाळगले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
या चिनी सेन्सॉरशिपची व्याप्ती किती कडक आहे, हे ‘शिंजिंग बाओ’ (द बीजिंग न्यूज) या सरकारी वृत्तपत्राच्या एका वृत्तावरून स्पष्ट होते. या अहवालानुसार, सोशल मीडियावर पुरासंबंधी माहिती किंवा व्हिडिओ पोस्ट करून “अफवा पसरवल्याचा” ठपका ठेवत चिनी प्रशासनाने किमान १० इंटरनेट वापरकर्त्यांवर कायदेशीर कारवाई केली आहे. वीचॅट (WeChat) आणि वेईबो (Weibo) सारख्या चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पुराचे नागरिक-निर्मित व्हिडिओ क्षणार्धात डिलीट केले जात आहेत.
आरएसएफच्या आशिया-पॅसिफिक विभागाच्या प्रमुख अलेक्झांड्रा बिएल्कोव्स्का यांनी चीनच्या या धोरणावर तीव्र शब्दात टीका केली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली तिबेट प्रदेश हा माहितीच्या दृष्टीने एक ‘आभासी कृष्णविवर’ (Information Black Hole) बनला असल्याचे त्यांनी म्हटले. स्वतंत्र माहिती बाहेर पडू न देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी विनाशाचे आकडे लपवणे, हे चिनी प्रशासनाचे जुनेच धोरण राहिले आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan News : पाकिस्तानची नापाक हरकत! नरोवालमध्ये शतकाहून जुने मंदिर जमीनदोस्त; भारताकडून कडक कारवाईची मागणी
याच विषयावर बोलताना ‘तिबेट रेडिओ’ या स्वतंत्र मीडिया आऊटलेटचे मुख्य संपादक कलसांग जिग्मे यांनी सांगितले की, मागील नैसर्गिक आपत्तींच्या तुलनेत या वेळी चीनने माहितीवर लादलेली नियंत्रणे अभूतपूर्व आणि अत्यंत कडक आहेत. पत्रकारांना प्राथमिक माहिती मिळवणेही कठीण झाले आहे. परदेशात किंवा निर्वासित म्हणून राहणाऱ्या तिबेटी नागरिकांशी संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते नागरिक भीतीने काहीही बोलण्यास नकार देत आहेत. सार्वजनिकपणे माहिती दिल्यास तिबेटमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना चिनी पोलीस उचलून नेतील किंवा छळ करतील, अशी प्रचंड भीती त्यांच्या मनात घर करून राहिली आहे.
चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार या पुरामध्ये केवळ १६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ‘तिबेट रेडिओ’ने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जमा केलेल्या माहितीनुसार किमान २९ तिबेटी नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. स्थानिक तिबेटी संघटनांच्या मते, वास्तविक पाहता हा मृत्यूचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतो. परंतु, संपूर्ण परिसराची नाकेबंदी केल्यामुळे आणि विश्वासार्ह स्त्रोतांपर्यंत पोहोचणे अशक्य बनवल्यामुळे विनाशाचा खरा टक्का स्पष्ट होत नाहीये.