Civil war flares up again in Syria 70 perish in fierce clashes in Latakia
दमास्कस – सीरियाच्या लताकिया प्रांतात राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे समर्थक आणि सुरक्षा दल यांच्यात जबरदस्त संघर्ष उफाळला आहे. या हिंसक चकमकीत आतापर्यंत 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स (SOHR) च्या माहितीनुसार, जबलेह शहरात हा संघर्ष सुरू झाला, जिथे सुरक्षा दलांनी असद समर्थकांना लक्ष्य करत लष्करी मोहिम सुरू केली.
ही चकमक असद समर्थक आणि माजी लष्करी कमांडर सुहेल अल-हसन याच्या नेतृत्वाखालील गटादरम्यान झाली. “द टायगर” म्हणून ओळखला जाणारा सुहेल अल-हसन पूर्वी असद सरकारसाठी मोठ्या लष्करी मोहिमा राबवणारा अधिकारी होता. मात्र, असद सरकार कोसळल्यानंतर त्याने स्वतःचा गट स्थापन केला आणि विद्यमान प्रशासनाविरोधात बंड पुकारले. SOHR च्या अहवालानुसार, सुरुवातीला सुहेल अल-हसनच्या समर्थकांनी सुरक्षा चौक्यांवर जोरदार हल्ले चढवले. प्रत्युत्तरादाखल सीरियन सैन्याने लताकियातील एका गावावर हेलिकॉप्टरमधून बॉम्बहल्ला केला. यामुळे या संघर्षाने अधिक तीव्र स्वरूप घेतले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : विमानात अश्लील प्रकार! महिलेने सर्वांसमोर काढले कपडे, नाईलाजाने पायलटने उचलले ‘असे’ पाऊल
या चकमकीत आतापर्यंत ७० लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १६ सुरक्षा कर्मचारी आणि २८ असद समर्थक सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय अनेकांना अटक करण्यात आली असून काही जण जखमी असल्याचे वृत्त आहे. या लढाईमुळे संपूर्ण लताकिया प्रांतात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लताकियाचे सुरक्षा संचालक लेफ्टनंट कर्नल मुस्तफा कुनाफती यांनी सांगितले की, या सशस्त्र गटाचा संबंध युद्ध गुन्हेगार सुहेल अल-हसनशी आहे. अल-हसनवर यापूर्वीही नागरिकांविरुद्ध नरसंहार केल्याचा आरोप आहे. २०१५ मध्ये त्याने असद सरकारच्या वतीने बंडखोरांविरुद्ध मोठ्या लढाया लढल्या होत्या.
सध्या जबलेह आणि लताकिया भागात सुरक्षा दल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर हल्ल्यानंतर अलावाइट समुदायाच्या सदस्यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की, या हल्ल्यात शांततापूर्ण आंदोलकांना लक्ष्य करण्यात आले आहे. अशा आरोपांमुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या भागात आणखी फौजफाटा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या वतीने हा संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याचे स्पष्ट होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘देव खरोखरच अस्तित्वात आहे…’ हार्वर्डच्या शास्त्रज्ञाने चक्क एका गणिताच्या सूत्राने केले सिद्ध
डिसेंबर २०२४ मध्ये बंडखोरांनी बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवले होते. त्यानंतर असद यांना देश सोडावा लागला आणि ते रशियाला पलायन झाले. त्यानंतर सीरियामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. लताकियातील हा हिंसाचार असद समर्थकांना विरोध करणाऱ्या नव्या प्रशासनासाठी मोठे आव्हान बनला आहे. हा संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. लताकिया आणि जबलेहमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी लागतील. अन्यथा हा संघर्ष संपूर्ण सीरियामध्ये पुन्हा एकदा गाजेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.