ट्रुडोंनी राजीनामा देताच ट्रम्प यांची प्रतिक्रिया; कॅनडाला अमेरिकेचा भाग होण्याच्या ऑफरचा केला पुनरुच्चार
वॉश्गिंटन: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा आणि पक्षनेत्याचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पहिली प्रतिक्रीया मांडली. त्यांनी कॅनडाला अमेरिकेचा भाग होण्याच्या होण्याची पुन्हा एकदा ऑफर दिली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी ही ऑफर सोशल मीडियावरून दिली. तसेच त्यांनी ट्रुडो राजीनामा देणार हे माहित असल्याचे म्हटले.
काय म्हणाले ट्रम्प-
ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका आता कॅनडाशी व्यापार तुटीचा सामना करू शकत नाही, तसेच त्याला जास्त अनुदान देणेही शक्य नाही. कॅनडाला आपला आर्थिक अस्तित्व टिकवण्यासाठी या अनुदानाची गरज आहे. ट्रूडो यांना ही बाब ठाऊक होती, म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला. ट्रम्प यांनी असेही म्हटले की कॅनडा अमेरिकेत सामील झाल्यास कोणतेही टॅरिफ लागणार नाहीत, कर कमी होतील आणि कॅनडा रशियन व चिनी जहाजांच्या धोक्यांपासून सुरक्षित राहील. याआधी 2024 मध्ये फ्लोरिडामध्ये ट्रम्प व ट्रूडो यांच्या भेटीतही ट्रम्प यांनी विनोदाने कॅनडाला 51वे राज्य होण्याचा प्रस्ताव दिला होता.
ट्रुडोंची अमेरिकेचा भाग बनण्यावर प्रतिक्रीया
जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी नवीन वर्षाच्या सुरूवातीला ट्रम्प यांच्या अमेरिकेचा भाग बनण्यावर आपली प्रतिक्रीया दिली होती. ट्रुडोंनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत म्हटले होते की, कॅनडा हा देश मजबूत आणि स्वतंत्र आहे. हा देश आमचे घर असून याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर यासंबंधित पोस्ट देखील केली होती. मात्र, आता त्यांच्या राजिनाम्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाला अमेरिकेचा भाग बनण्याची ऑफर दिली आहे.
अमेरिका-कॅनडातील राजकीय घटनाक्रम
सोमवारी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीतील इलेक्टोरल मतमोजणीनंतर उपाध्यक्ष कमला हैरिस यांनी ट्रम्प यांना अधिकृत विजेता घोषित केले. दुसरीकडे, जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ट्रूडो यांच्यावर त्यांच्या पक्षातील खासदारांकडून बराच काळ राजीनाम्याचा दबाव होता. यामुळे ते एकाकी पडत चालले होते. ट्रूडो यांनी राजीनाम्याची घोषणा करताना म्हटले की, “घरातच संघर्ष करावा लागत असल्यास आगामी निवडणुकीत मी चांगला पर्याय ठरू शकत नाही.” कॅनडामध्ये यावर्षी संसदीय निवडणुका होणार आहेत.
लिबरल पार्टीपुढील आव्हाने
ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर लिबरल पक्षाकडे लोकप्रिय आणि प्रभावी नेतृत्व नसून, नवीन पक्षनेता निवडण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येईल. मात्र, या अधिवेशनाला काही महिने लागू शकतात. यामुळे पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या जस्टिन ट्रुडोंच्या जागी परराष्ट्र मंत्री मेलानी जोली, डोमिनिक लेब्लांक आणि मार्क कानी यांची नावे पुढे येत आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमतासाठी 170 जागा लागतात, परंतु पक्षाकडे फक्त 153 खासदार आहेत. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा काढून घेतल्याने लिबरल सरकार अस्थिर झाले आहे.