ट्रुडोंच्या राजिनाम्यामुळे सत्तापरिवर्तनाची शक्यता; भारत-कॅनडा संबंध सुधारणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नुकताच पंतप्रधानपदाचा आणि लिबिलरल पार्टीच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्रुडोंच्या कार्यकाळात भारत आणि कॅनडाच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ट्रुडो यांच्या निर्णयानंतर भारतात आशावाद निर्माण झाला आहे की, आगामी काळात या संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. विशेषतः खालिस्तानवादाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर दोन्ही देशांमधील संबंध जवळपास तुटल्यासारखे झाले होते. आता सत्तापरिवर्तनाने परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
जस्टिन ट्रुडोंच्या भारतावरील टिका
जस्टिन ट्रूडो पंतप्रधानपदावर असताना खालिस्तानवादी शक्तींना अप्रत्यक्ष समर्थन दिल्याचे आरोप वारंवार करण्यात आले आहेत. 2020 मध्ये भारतीय शेतकरी आंदोलनावर त्यांची टिका आणि 2023 मध्ये खालिस्तानी नेते हरदीप निज्जर यांच्या हत्येसाठी भारतीय अधिकाऱ्यांवर थेट आरोप करणे या घटनांमुळे भारत-कॅनडा संबंध अधिक ताणले गेले.
त्याचबरोबर, जगमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील न्यू डेमोक्रॅटिक पार्टीसोबत केलेल्या राजकीय सहकार्यामुळेही खालिस्तान समर्थक गटांना बळ मिळाल्याचा आरोप झाला. परिणामी, भारताने कडक पावले उचलत कॅनडामधील आपल्या राजनैतिक उपस्थितीला आळा घातला.
पियरे पोइलिवर सत्तेत येण्याची शक्यता
सध्या, कॅनडामध्ये पियरे पोइलिवर यांच्या नेतृत्वाखाली कन्झर्वेटिव्ह पक्ष सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोइलिवरे यांनी ट्रुडो यांच्या भारविरोधी भूमिकेवर अनेक टिका केल्या आहेत. तसेच त्यांनी भारतासोबत व्यावसायिक आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. त्यांनी जाहीर केले आहे की कॅनडाने भारतासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कॅनडा भारतीय संबंध सुधारण्याची आशा
कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांना परस्पर हिताच्या आर्थिक आणि धोरणात्मक गरजांमुळे एकमेकांशी जवळीक राखणे आवश्यक आहे. भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा अर्थव्यवस्था असलेला देश आहे, तर कॅनडाला विविध व्यापारिक आणि उर्जेच्या गरजांसाठी भारतासोबत भागीदारी करणे उपयुक्त ठरू शकते. ट्रूडो यांच्या राजीनाम्यामुळे सत्तेत आलेल्या नवीन नेतृत्वाकडून अपेक्षा आहे की, त्यांनी राजकीय मतभेद सोडून व्यावसायिक आणि धोरणात्मक हितसंबंधांना प्राधान्य द्यावे.
पियरे पोइलिवरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून भारताशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली गेल्यास भारत-कॅनडा संबंध नव्या उंचीवर पोहोचू शकतात. शेवटी, या सत्तापरिवर्तनाने भारत आणि कनाडा यांच्यातील संबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल अशी आशा बाळगूया. खालिस्तानसंबंधित वाद मागे टाकत दोन्ही देशांनी विश्वास आणि सहकार्यावर आधारित संबंध विकसित करणे गरजेचे आहे.