Donald Trump's will visit India soon PM Modi’s White House invite likely
वॉश्गिंटन: डोनाल्ड ट्रम्प उद्या(दि. 20 जानेवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. निवडणुकीत विजय झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या विधानावरुन ट्रम्प चर्चेचा विषय बनत आहेत. दरम्यान पदाभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात ट्रम्प यांची त्यांच्या सल्लागारांशी चर्चा सुरू असून लवकरच भट देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनलाही भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे.
शपथविधीच्या कार्यक्रमासाठी ट्रम्प आपल्या पत्नी मेलानिया आणि मुलगा बैरोनसोबत खासगी विमानाने वॉशिंग्टन डीसी येथील डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत.
भारत दौर्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौर्याबाबत सल्लागारांशी चर्चा केली असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. ही भेट एप्रिलच्या सुरुवातीला किंवा वर्षाच्या शेवटी होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाइट हाऊसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करण्याच्या विचारावरही ट्रम्प कार्य करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित केला जाऊ शकतो.
चीनबरोबर संबंध सुधारण्याची इच्छा
मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त कर लावण्याची धमकी दिली होती, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. मात्र, ट्रम्प आता चीन-अमेरिका संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करु इच्छित आहेत आणि यासाठी त्यांनी चीन दौर्याचा विचारही सुरू केला आहे.
शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा
दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. शी जिनपिंग यांनी चीन-अमेरिका संबंधांना महत्त्व दिल्याचे सांगत, ट्रम्प यांच्या नव्या कार्यकाळात दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्याची आशा व्यक्त केली. त्यांनी चीन-अमेरिका संबंधांमध्ये नवीन सुरुवात आणि प्रगती साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारत आणि चीन दौऱ्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प आंतरराष्ट्रीय संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. विशेषतः व्यापार, संरक्षण आणि जागतिक स्थिरतेसाठी या दौऱ्यांना महत्त्व दिले जात आहे.
Quad Summit
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी 21 जानेवारीला क्वाड समितीच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक वॉशिंग्टन डीसीमध्ये होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच बैठक असेल.या बैठकीत ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या देशांचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेत पोहोचले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.