फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पांवरील हल्ला अमेरिकेच्या अंगलट; अमेरिकेचे 50000 सैनिक इराणच्या टार्गेटवर
मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या इस्रायल-इराण संघर्षात आता अमेरिकेची थेट एंट्री झाल्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष मध्य पूर्वेकडे लागलं आहे. रविवारी (२२ जून २०२५) पहाटे अमेरिकेने इराणमधील तीन महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. यानंतर इराणने कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली असून, अमेरिकेला थेट इशारा दिला आहे.
“आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आता अशी अनेक कारणे निर्माण झाली आहेत की, पश्चिमी राष्ट्रांवर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही.” असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केलं आहे.“सर्वप्रथम आमच्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पहा. एकदा हल्ले थांबले की, आम्ही ठरवू की कशा पद्धतीने राजनैतिक संवाद पुढे न्यावा. पण हे स्पष्ट आहे की, आमच्या अणुऊर्जा केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार आहे. आता अशी कोणतीही सीमा उरलेली नाही जी अमेरिकेने ओलांडलेली नाही.”
इराणकडून संकेत देण्यात आले आहेत की, जर अमेरिका अशा प्रकारे हस्तक्षेप करत राहिला, तर त्या प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवरही कारवाई होऊ शकते. तसेच, स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचाही विचार केला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची रविवारी मॉस्कोला रवाना झाले आहेत. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली आहे. “रशिया हा आमचा मित्र देश आहे आणि आमच्या देशाची भूमिका त्यांच्या समोर मांडणार आहोत.”
“राजनैतिक संवादाची दारं कोणत्याही देशाने बंद करू नयेत, पण आता तशी कोणताही शक्यता नाही. माझ्या देशावर हल्ला झाला आहे, आम्हाला त्याचा सामना करावा लागला आहे. म्हणूनच, आता आमचा उत्तर देणे ही आमच्या स्वसंरक्षणाची जबाबदारी आहे, असल्याही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी आपल्या टेलीग्राम चॅनलवर लिहिले आहे की, “स्वतःला शांततेचा दूत म्हणवणाऱ्या ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी नवा युद्धप्रसंग निर्माण केला आहे.”
मिडल ईस्टमधील हे वाढते तणाव सध्या जगातील सर्वच प्रमुख देशांसाठी चिंता निर्माण करणारे ठरत आहे. पुढील काही तास किंवा दिवसांत घडणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.
अमेरिकेने मध्यपूर्वेत पहिल्यांदा १९५८ मध्ये सैन्य पाठवलं. लेबनॉन संकटाच्या वेळी बेरूतमध्ये सैनिकांची तैनाती केली. त्या वेळी सुमारे १५,००० मरीन आणि सैनिक पाठवण्यात आले होते. २०२५ च्या मध्यपर्यंत, अंदाजे ४०,००० ते ५०,००० अमेरिकी सैनिक मध्यपूर्वेत आहेत. हे सैनिक मोठ्या कायमस्वरूपी तळांवर आणि लहान तात्पुरत्या तळांवर तैनात आहेत.
सर्वाधिक अमेरिकी सैनिक कतार, बहरैन, कुवेत, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये आहेत. हे तळ हवाई आणि नौदल ऑपरेशन्ससाठी, प्रादेशिक लॉजिस्टिक्स, गुप्तचर संकलन आणि लष्करी उपस्थितीसाठी महत्त्वाचे मानले जातात.