Former Pakistani Prime Minister to be released from prison Big statement from Shehbaz Sharif's advisor
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान तुरुंगात आहेत. दरम्यान त्यांच्या सुटकेबद्दल पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या राजकीय सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते. मात्र, यासाठी त्यांना 9 मे 2023 रोजी झालेल्या हिंसक घटनांसाठी माफी मागावी लागेल.
दोन वर्षापूर्वी 9 मे 2023 रोजी इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलने झाली होती. यासाठी पाकिस्तान सरकारने आणि सैन्याने PTI पक्षाला जबाबदार धरले. मात्र, PTI या आरोपांना वारंवार फेटाळत आला आहे. दरम्यान शहबाज शरीफ यांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी एका मुलाखतीदरम्यान इम्रान खान यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, इम्रान खान यांनी पाकिस्तानला मोठ्या राजकीय संकटात ढकलेले आहे. त्यांनी क्रांती घडवण्यासाठी प्रयत्न केला, पंरतु पाकिस्तानमध्ये केवळ राजकीय लढाईतून यश मिळते, क्रांतीतून नाही.
दरम्यान मुलाखतीच्या वेळी राणा सनाउल्लाह यांना इम्रान खानच्या सुटकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी म्हटले की, इम्रान खान यांनी 9 मे 2023 रोजी झालेल्या हिंसाचाराबद्दल माफी मागितली, तर चर्चा होऊ शकते. त्यांनी इशारा दिला की, सध्याच्या परिस्थितीत PTI ला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. विशेषत: 24-26 नोव्हेंबर 2024 दरम्यान इस्लामाबादमधील मोर्चामुळे शक्यता फारच कमी आहे.
राणा सनाउल्लाह यांनी यापूर्वी असेही म्हटले होते की, जर पाकिस्तानी न्यायालयाने इम्गान खान यांना जामीन मंजुरी दिली किंवा सोडण्याचा आदेश दिला, तर शहबाज शरीफ यांच्या सरकारला कोणत्याही आक्षेप राहणार नाही.
PTI ने यापूर्वी सरकारसोबत अनेक चर्चा केल्या असून त्या अयशस्वी ठरल्या आहेत. यामुळे PTI ने विरोधी पक्षासोबत मिळून सत्ताधारी गटाविरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निदर्।नाचा उद्देश पाकिस्तानमधील घटनात्मक व्यवस्था आणि कायद्याचे राज्य पुन्हा प्रस्थापित करणे आहे, तसेच राजकीय कैद्यांची सुटका करणे आहे.
सध्या राणा सनाउल्लाह यांच्या या विधानामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय तणाव बिघडण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांची सुटका, सरकारविरोधी आंदोलने आणि देशातील राजकीय संघर्ष तीव्र होत चालले आहेत.
याचदरम्यान पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी (BLA) केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये भितीचे वातावरण आहे.