फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाकडून 9 मे 2023 रोजी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) त्यांच्या विरोधातील पुरावे तपासून हा निर्णय दिला. या हिंसाचारात इम्रान खान समर्थकांनी लष्करी तळांवर हल्ले केले होते. तसेच लष्करी कार्यालयांना आग लावल्याचा आरोप होता.
लष्करी मालमत्तांवर हल्ले केल्याचा देखील गंभीर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने ऑडिओ आणि व्हिडिओ पुराव्यांच्या आधारावर त्यांना दोषी ठरवले. तसेच, न्यायालयाने इम्रानच्या आठ प्रकरणांतील जामीन अर्जही फेटाळून लावला आहे.याशिवाय, इम्रान खान यांच्यावर लष्करी मालमत्तांवर हल्ले केल्याचा देखील गंभीर आरोप करण्यात आला आहे. न्यालयाने नमूद केले आहे की, 9 आणि 11 मे रोजी झालेल्या हिंसाचारामागे इम्रान खान यांचा सहभाग होता. सरकारतर्फे सादर केलेल्या गुप्त पोलिसांच्या रेकॉर्डिंगमध्येही याचा पुरावा मिळाला आहे.
इम्रान खान यांच्यावरील इतर आरोप
यापूर्वी तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला जामीन मंजूर झाला होता. मात्र, अन्य प्रकरणांमुळे त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नाही. 5 ऑगस्ट 2023 रोजी तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते अदियाला तुरुंगात आहेत. इम्रान खान यांच्यावर अनेक प्रकरणांचे आरोप आहेत. बुशरा बीबीसोबत गैर-इस्लामिक विवाहाचा आरोप, सायफर गेट घोटाळा, आणि तोशाखाना प्रकरणे यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
इम्रान खानच्या समर्थकांचेे आंदोलन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तोशाखाना प्रकरणात इम्रान आणि बुशरावर इतर देशांच्या भेटवस्तू विक्री करून त्यांची माहिती लपवल्याचा आरोप होता. काही प्रकरणांत सुटका झाली असली, तरी अनेक गंभीर आरोपांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा सरकारचा दावा आहे. गेल्या 485 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना आगामी काळात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या समर्थकांनी पुन्हा हिंसाचार करण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.
बुशरा बीबीवर काय आरोप आहेत?
इम्रान खान आणि बुशरा बीबी या दोघांवर 50 अब्ज पाकिस्तानी रूपयांचा (190 दशलक्ष पौंड) गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे, जे ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने एका प्रॉपर्टी व्यावसायिकासोबत केलेल्या करारानुसार पाकिस्तानला परत केले होते. हा पैसा पाकिस्तानच्या राष्ट्रीय तिजोरीसाठी होता, परंतु बुशरा आणि खान यांना विद्यापीठ बांधण्यासाठी मदत करण्यासाठी वैयक्तिक फायद्यासाठी वापरला गेला. अल-कादिर ट्रस्टच्या विश्वस्त या नात्याने बीबीवर या कराराचा फायदा झाल्याचा आरोप आहे. बुशरा यांच्यावर झेलममधील अल-कादिर विद्यापीठासाठी ४५८ कनाल जमीन घेतल्याचा आरोप आहे.