नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाच्या लष्कर आणि सरकारला सल्ला दिला आहे. काही मंत्री अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची धमकी देत आहेत. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला केला तर असे युद्ध सुरू होईल जे कधीही संपणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
-केंद्रीय गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिला होता इशारा
इम्रान यांचे हे विधान अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. खरं तर, केंद्रीय गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं की, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) दहशतवादी पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. त्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळतो. हे हल्ले ताबडतोब थांबले नाहीत तर आमचे सैन्य अफगाणिस्तानात घुसून हल्ला करेल.
ओसामा बिन लादेनलाही शहीद घोषित केले होते
इम्रान यांना त्यांचे टीकाकार ‘तालिबान खान’ म्हणतात. इम्रान यांनी संसदेत ओसामा बिन लादेनलाही शहीद घोषित केले होते. मंगळवारी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना इम्रान यांनी बऱ्याच दिवसांनी अफगाणिस्तानवर भाष्य केले. ते म्हणाले की, अफगाणिस्तान हा आपला शेजारी देश आहे आणि त्यांच्याशी आपले चांगले संबंध असले पाहिजेत. सरकारने जनतेसमोर खोटे बोलणे बंद करून सत्य सांगावे. खान पुढे म्हणाले की, गृहमंत्री सनाउल्लाह अफगाणिस्तानवरील हल्ला करण्याची भाषा बोलत आहेत. असे झाले तर पुन्हा शांतता कायम राहणार नाही. जर आपल्या सैन्याने अफगाणिस्तानवर आक्रमण केले तर एक युद्ध सुरू होईल जे कधीही संपणार नाही. इम्रान म्हणाले की, जरा विचार करा. अफगाणिस्तानने मदत थांबवली तर काय होईल? सरकार अफगाणिस्तानला का धमकावत आहे, त्यांच्याशी चर्चा का करत नाही. खैबर पख्तुनख्वामध्ये आमचे सरकार आहे, असे लोक म्हणतात. पोलिस दहशतवादाविरुद्ध लढू शकतील की नाही, त्यांच्याकडे तर शस्त्रेही नाहीत.