India to induct third nuclear submarine into its navy
नवी दिल्ली: दक्षिण चीन समुद्रानंतर आता हिंद महासागरातही शस्त्रास्त्रस्पर्धा वाढली आहे. चीनच्या वाढत्या नौदल उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत लवकरच आपल्या तिसऱ्या अणु ऊर्जा चालित पाणबुडीला नौदलात सामील करणार आहे. आयएनएस अरिदमन ही पाणबुडी यावर्षाच्या अखेरीस नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघाट या दोन परमाणु पाणबुड्या कार्यरत आहेत.
भारताची ही नवीन पाणबुडी अशा वेळी नौदलात सामील होत आहे, जेव्हा पाकिस्तान आपल्या नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी चीन आणि तुर्कीची मदत घेत आहे. पाकिस्तानची नौदल शक्ती झपाट्याने वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनकडून अत्याधुनिक हंगोर क्लासच्या आठ पाणबुड्या विकत घेतल्या जात आहेत. यातील पहिली पाणबुडी एप्रिल 2024 मध्ये पाण्यात उतरवण्यात आली असून सध्या याची चाचणी सुरू आहे.
चीनची नौदल ताकद
मिळालेल्या माहितीनुसार, चीनकडे 6 स्ट्रॅटेजिक अणु पाणबुड्या, 6 अटॅक अणु पाणबुड्या आणि 48 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या आहेत. यामध्ये एआयपी तंत्रज्ञानाने ही पाणबुडी सुरक्षित आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणबुड्या अनेक दिवस पाण्यात राहू शकतात. चीनच्या जुन्या पाणबुड्या निवृत्त होऊनही 2025 पर्यंत त्यांची संख्या 65 च्या आसपास राहील, तर 2035 पर्यंत ती 80 वर पोहोचण्याची शक्यता आहे.
भारत अजूनही मागे?
भारताची पहिली अटॅक परमाणु पाणबुडी 2036 पर्यंत नौदलात दाखल होणार आहे, तर दुसरी 2038 मध्ये येईल. सध्या भारताकडे 6 कलवरी श्रेणीच्या पारंपरिक पाणबुड्या आहेत. भारत आता फ्रान्सकडून आणखी 3 कलवरी श्रेणीच्या पाणबुड्या घेण्याच्या विचारात आहे. मात्र, या पाणबुड्यांमध्ये AIP तंत्रज्ञान नाही, यामुळे त्या मर्यादित वेळेसाठीच पाण्याखाली राहू शकतात. भारत आता या पाणबुड्यांच्या तंत्रज्ञान सुधारण्याच्या प्रक्रियेत AIP प्रणाली बसवण्याचा विचार करत आहे, यामुळे त्या सलग 3 आठवडे पाण्यात राहू शकतील.
पाकिस्तानचा वेगवान आधुनिकीकरणाचा प्रयत्न
भारत अद्याप या शस्त्रस्पर्धेत मागे असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तान मात्र आपल्या नौदलात चीनच्या मदतीने 30 अत्याधुनिक युद्धनौका आणि 8 नवीन पाणबुड्या सामील करत आहे. त्यामुळे हिंद महासागरात सामरिक संतुलन बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि जर्मनीमध्येही सहा नवीन AIP-युक्त पाणबुड्यांसाठी चर्चा सुरू असून, पहिली पाणबुडी 2030 नंतरच नौदलात दाखल होईल. त्यामुळे सध्या चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारताच्या नौदल शक्तीला आव्हान निर्माण झाले आहे.