US-China Trade War: चीन पडला डोनाल्ड ट्रम्पवर भारी; अमेरिकन उत्पादनाबाबत घेतला मोठा निर्णय (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
बिजिंग: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर कर लादल्यानंतर तीन्ही देश संतप्त झाले होते. कॅनडा आणि मेक्सिकोने डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाच्या प्रत्युत्तर कर लदाला होता. आता चीननेही अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने अमेरिकन उत्पादनांवर शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर 10 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार असून अमेरिकने लादलेल्या कराच्या प्रत्युत्तरात हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकन उत्पादनांवर 10 ते 15 टक्के कर
चीनच्या अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन उत्पादनांवर 10 ते 15 टक्के कर लादण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. या नव्या टॅरिफमुळे चीनमध्ये अमेरिकेहून आयात होणाऱ्या मोठ्या कार, पिकअप ट्रक, द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG), कच्चे तेल आणि शेती उपकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चीनने कोळसा आणि नैसर्गिक वायूवर 15%, तसेच पेट्रोलियम पदार्थ, कृषी उत्पादने, उच्च त्सर्जन असलेली वाहने आणि पिकअप ट्रक यांसारख्या वाहनांवर 10% अतिरिक्त कर लादले आहे. याशिवाय, चीनने काही महत्त्वाच्या खनिज निर्यातीवर देखील निर्बंध आणले आहेत.
अमेरिका-चीन व्यापारयुद्ध अधिक तीव्र
अमेरिका आणि चीनमदील व्यापारयुद्ध दिवसेंदिवस अदिक तीव्र होत चालले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच चीनसह अनेक देशांवर शुल्क लादले आहे, यामुळे चीननेही प्रत्युत्तरदाखल विविध पावले उचलली आहेत. या नव्या टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील व्यापारसंबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.
चीनच्या अर्थ मंत्रालयाने अमेरिकेच्या या टॅरिफ धोरणाचा निषेध केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेने एकतर्फी टॅरिफ लावणे हे जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे सरळसरळ उल्लंघन आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिका आणि चीनमधील सामान्य आर्थिक आणि व्यापारी सहकार्याला कमकुवत करत असल्याचेही चीनने स्पष्ट सांगितले आहे.
अमेरिकन कंपन्यांवरही चीनचा आघात
चीनने केवळ टॅरिफच नाही, तर काही अमेरिकी कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चीनने टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. तसेच, टंगस्टन, टेल्यूरियम, बिस्मथ, मोलिब्डेनम आणि इंडियम या महत्त्वाच्या खनिज पदार्थांना निर्यात नियंत्रण यादीत समाविष्ट केले आहे.
याशिवाय, चीनने अमेरिकी वस्त्र कंपनी PVH आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी इलुमिना यांना “अविश्वसनीय संस्थांच्या यादीत टाकले आहे. चीन सरकारच्या मते, या कंपन्यांनी चीनच्या उद्योगांसोबतच्या व्यवहारांमध्ये अडथळे आणले आणि चीनविरोधी धोरणे अवलंबली. अमेरिका आणि चीन यांच्यातील हा तणाव भविष्यात व्यापारयुद्धाच्या नव्या टप्प्यात जाण्याची चिन्हे आहेत. या नव्या टॅरिफ आणि व्यापार निर्बंधांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.