
Indian goods costlier in US after Trump’s 50 percent tax shops empty ahead of Diwali
50% tariff on Indian goods : अमेरिकेत भारतीयांची मोठी वस्ती असलेल्या “मिनी इंडिया”त( New Jersey) सध्या चिंतेचे वातावरण आहे. दिवाळी(Diwali) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे; परंतु यंदा भारतीय वस्तूंची चमक मंदावली आहे. कारण, ट्रम्प प्रशासनाने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर तब्बल ५०% आयात शुल्क लावले आहे. परिणामी, भारतीय खाद्यपदार्थ, मसाले, कपडे, दागिने आणि सणासुदीच्या वस्तू महागल्या आहेत. दुकाने जरी भरलेली असली तरी खरेदीदार मात्र कमी झाले आहेत.
न्यू जर्सी हे अमेरिकेतील भारतीय लोकसंख्येचे तिसरे मोठे केंद्र मानले जाते. सुमारे ४,४०,००० भारतीय वंशाचे नागरिक येथे वास्तव्यास आहेत. ओक ट्री रोडवरील एडिसन परिसर, पटेल ब्रदर्ससारखी किराणा दुकाने, तनिष्क व राज ज्वेलर्ससारखे दागिन्यांचे ब्रँड, हल्दीरामसारखे खाद्य पदार्थ हे सारे येथे “लिटल इंडिया”ची ओळख जपतात. पण आयात शुल्कामुळे व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे.
पटेल ब्रदर्सचे सह-मालक राज पटेल यांनी सांगितले, “आयात केलेल्या काही उत्पादनांच्या किंमती वाढल्या आहेत. पण दिवाळीचा काळ लक्षात घेऊन आम्ही अजून ग्राहकांवर भार टाकलेला नाही. मात्र भविष्यात किंमती वाढवाव्याच लागतील.” दागिन्यांच्या दुकानांचा त्रास तर अधिकच वाढला आहे. तनिष्क व राज ज्वेलर्सकडून सांगण्यात आले की, दागिन्यांवर आता ५६% आयात शुल्क लादले गेले आहे. दिवाळी, थँक्सगिव्हिंग आणि ख्रिसमस हा व्यवसायासाठी महत्त्वाचा हंगाम असतो. पण एवढ्या जास्त करामुळे विक्री टिकवणे कठीण झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PoK Shutdown : फोन बंद, रस्ते ओसाड आणि 3,000 सैनिक तैनात; पाकिस्तानच्या पीओकेमध्ये काही अघटित घडण्याचे संकेत
भारतीय खाद्यपदार्थांची खास चव टिकवण्यासाठी लागणारे मसाले भारतातून आयात करावे लागतात. लोकप्रिय दक्षिण भारतीय रेस्टॉरंट “सरवण भवन”चे व्यवस्थापक राजमोहन कन्नबीरन म्हणाले, “आमच्या खास डिशसाठी लागणारे बहुतेक मसाले भारतातून येतात. आता त्यावर ५०% शुल्क आहे. पुरवठादारांनीही किंमती वाढवल्या आहेत. ग्राहकांवर भार टाकला तर व्यवसाय कमी होईल, आणि जर नाही टाकला तर आम्हाला तोटा होईल.”
सणासुदीच्या काळात नेहमी गजबजलेले एडिसनचे बाजारपेठेतील वातावरण यंदा काहीसे ओस पडले आहे. खरेदीदार वाढलेल्या किंमतींमुळे मागे हटत आहेत. दागिने, साड्या, मिठाई, दिवाळी सजावटीच्या वस्तू सगळ्याच महाग झाल्या आहेत. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादात घट दिसू लागली आहे.
रटगर्स विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक टॉम प्रुसाझ यांच्या मते, “भारतीय उत्पादनांना अमेरिकेत थेट पर्याय नाही. किरकोळ विक्रेत्यांना जास्त किंमतीत माल विकत घ्यावा लागेल आणि तो कमी किंमतीत विकता येणार नाही. अखेर ग्राहकांवरच वाढीव भार पडणार आहे. जर हा टॅरिफ वॉर लवकर थांबला नाही, तर केवळ भारतच नाही तर अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Violence: काल ओली हजर झाले अन् आज घोटाळा, पाच मंत्र्यांवरही कारवाई; नवीन सरकारचा अभूतपूर्व निर्णय
न्यू जर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी नुकत्याच पत्रकार परिषदेत सांगितले की, “दोन्ही देशांचे खूप काही धोक्यात आहे. अमेरिका आणि भारत दीर्घकाळ दूर राहू शकत नाहीत. दीर्घकालीन भागीदारी हाच या तणावाचा उपाय ठरू शकतो.” त्यांनी भारत दौऱ्यावरून परतताना व्यापारी शिष्टमंडळासोबत चर्चा करून सामंजस्याचे प्रयत्न केले आहेत. सणासुदीचा काळ म्हणजे परंपरा, आनंद आणि खरेदीची धूम. मात्र यंदा अमेरिकेतील “मिनी इंडिया”त दिवाळीच्या उत्साहावर कराचा सावट आहे. व्यापारी आणि ग्राहक दोघेही द्विधा मनःस्थितीत आहेत उत्सव साजरा करावा की वाढलेल्या किंमतींसमोर नतमस्तक व्हावं? दोन्ही देशांमधील हा आर्थिक तणाव दूर होईल, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली असली तरी दिवाळीपूर्वी बाजारात पुन्हा रौनक येईल की नाही, हा मोठा प्रश्न उभा आहे.