
Masoud Pezeshkian New Delhi speech Iran President BRICS Summit 2026
पश्चिम आशियातील युद्धाचे ढग अधिक गडद होत असताना इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी भारताची राजधानी नवी दिल्ली येथून जागतिक व्यासपीठावरून अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या पेझेश्कियान यांनी एका विशेष मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले की, इराण कोणत्याही प्रकारची ‘गुंडगिरी’ किंवा ‘दडपशाही’ सहन करणार नाही.(BRICS Summit 2026)
धार्मिक नेते, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि उद्योजकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात पेझेश्कियान म्हणाले, “अमेरिका आणि इस्रायल आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण इराण त्यांच्यासमोर कधीही गुडघे टेकणार नाही. जर त्यांनी आम्हाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना तितक्याच ताकदीने उत्तर देऊ.” इराण आखाती प्रदेशात शांतता आणि सहअस्तित्वासाठी वचनबद्ध असला, तरी देशाचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास मागे हटणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
आपल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिका आणि इस्रायलवर नागरिकांना थेट लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप केला. दक्षिण इराणमधील एका शाळेवर झालेल्या कथित हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी सैन्याऐवजी सर्वसामान्य लोक, रुग्णालये आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याच्या धोरणावर जोरदार टीका केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?
“ते मानवाधिकार आणि स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात निष्पाप नागरिकांचा आणि वैज्ञानिकांचा जीव घेत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेला वाटत आहे की जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे आणि आर्थिक निर्बंधांमुळे इराणी जनता खचून जाईल आणि हार मानू लागेल, परंतु इराणी जनतेचा इतिहास असा आहे की ती कोणत्याही आक्रमकासमोर झुकलेली नाही, असा सडेतोड टोला त्यांनी लगावला. अमेरिका आणि इस्रायलची सध्याची पावले म्हणजे ‘लगाम नसलेल्या घोड्यावर स्वार होण्यासारखी’ असून या उन्मादामुळे अखेर त्यांचा स्वतःचाच विनाश होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भारत दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींसोबतची बैठक अत्यंत ‘फळदायी आणि सकारात्मक’ राहिल्याचे पेझेश्कियान यांनी नमूद केले.
Iranian President Masoud Pezeshkian warned that the global financial system remains vulnerable to political shocks because of its reliance on a limited number of currencies. | #BRICS2026 pic.twitter.com/pCD4TP9ndV — Firstpost (@firstpost) September 11, 2026
credit – social media and Twitter
या बैठकीत व्यापार, तंत्रज्ञान, संस्कृती, ऊर्जा सुरक्षा आणि कृषी क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. भारताला मध्य आशिया आणि युरोपशी जोडणाऱ्या चाबहार बंदराच्या विकासाबाबत आणि उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडोअरबाबत (INSTC) महत्त्वपूर्ण प्रगती साधण्याचा पुनरुच्चार करण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये बोलताना पेझेश्कियान यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर अमेरिकन डॉलरच्या प्रभावाला पर्याय निर्माण करण्याचे आवाहन केले. “आर्थिक सुरक्षा ही राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षेशी जोडलेली आहे. पाश्चात्य देशांकडून लादल्या जाणाऱ्या आर्थिक निर्बंधांना तोंड देण्यासाठी ब्रिक्स देशांनी आपापल्या स्थानिक चलनांमध्ये (Local Currencies) व्यापार वाढवला पाहिजे,” असे ते म्हणाले.
इराणकडे असलेले मुबलक ऊर्जा स्रोत आणि त्यांचे मोक्याचे भौगोलिक स्थान हे ब्रिक्स देशांसाठी अन्न आणि ऊर्जा पुरवठ्याची साखळी मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.