Iran President warns Trump on threats, nuclear talks to continue
तेहरान: अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. इराणच्या अणु कार्यक्रमांवर बंदी आणण्यासाठी अमेरिका सात्यत्याने इराणला धमक्या देत होता. दरम्यान दोन्ही देशात ओमानच्या मध्यस्थीने चर्चा देखील सुरु होती. परंतु काही कारणास्त ही चर्चा स्थगित करण्यात आली. याच वेळी ट्रम्प आखाती देशांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी रियाधमध्ये सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली. यावेळी इराणचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
ट्रम्प यांनी इराणला अणु प्रकल्प तातडीने बंद करण्याची धमकी दिली. यासाठी त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव देखील मांडला. या प्रस्तावात इराणला अणु प्रकल्प बंद करण्यास तसेत हमास, हिजबुल्लाह यांसारख्या दहशतवादी संघटनांना मदत थांबवण्यास सांगितले. नाहीतर इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले.
याच वेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराण अणु क्रार्यक्रमावर चर्चा सुरु ठेवेल. परंतु अमेरिकेच्या कोणत्याही प्राकरच्या धमक्यांना किंवा दबावाला घाबरणार नाही. आमच्या अणु क्रार्यक्रमाचा उद्देश युद्ध नाही. परंतु कोणत्याही धमक्या किंवा दबावाखाली आम्ही आमच्या हक्कांशी तडजोड करणार नाही. आम्ही आमच्या लष्करी, वैज्ञानिक आणि आण्विक क्षमता वाढणवण्यापासून मागे हटणार नाही.
पेझेश्कियान यांनी म्हटले की, अमेरिका आणि इराणमधील चर्चा सध्या तज्ज्ञांच्या पातळीवर पोहोचली आहे. दोन्ही देश व्यावहारिक बाबींवर चर्चा करत आहेत. मात्र इराणच्या युरेनियमचा साठा अजूनही गुंतागुंतीचा विषय राहिला आहे. इराणचे मते, त्यांचा अणु कार्यक्रम धोक्याचा नाही, हा केवळ त्यांच्या सार्वभौमात्वाच्या रक्षणासाठी आहे. परंतु अमेरिकेने इराणच्या या अणु कार्यक्रमाला पूर्णपणे विरोध केला असून इराण मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे बनवत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी अनेकवेळा इराणला अणुतळांवर लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, कोणताही करार न झाल्यास अमेरिका इराणच्या अणु कार्यक्रमाला नष्ट करुन टाकेल. अशा धमक्या अमेरिकेकडून अनेकवेळा देण्यात आल्या आहेत. सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान देखील ट्रम्प यांनी इराणच्या अणु कार्यक्रमांचा उल्लेख केला होता.
इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण हेतूंसाठी आहे. हा प्रकल्प संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेखीखाली (IAEA) सतत कार्यरत आहे.