Iran warns U.S. Supporters of Israel are our target China reacts too
Israel Iran Attack News : पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, इस्रायल आणि इराणमधील संघर्षाने गंभीर वळण घेतले आहे. इराणने इस्रायलच्या अणुऊर्जेसंबंधी लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देत शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या कारवाईनंतर इराणने थेट अमेरिकेलाही इशारा दिला आहे की, “जो कोणी इस्रायलच्या बाजूने उभा राहील, तो आमच्या निशाण्यावर असेल.” या घडामोडींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा पश्चिम आशियाकडे वळले आहे.
इराणने केलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, “इस्रायलला आम्ही यापुढे कुठलीही माफक वागणूक देणार नाही. जो कोणी त्याच्या बाजूने उभा राहील, त्यालाही आम्ही लक्ष्य करू.” हा इशारा स्पष्टपणे अमेरिकेच्या दिशेने निर्देशित होता, कारण अमेरिका ही इस्रायलची प्रमुख समर्थन करणारी राष्ट्र आहे. या धमकीने मध्यपूर्वेत तणाव अधिक वाढला असून, अमेरिकेसह नाटो राष्ट्रांचीही चिंता वाढली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran war : खामेनेईंच्या इराणला एका रात्रीत हादरवले; इस्रायलचे RAAM, SOUFA और ADIR ठरले बाहुबली
इराणने डागलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे मध्य इस्रायलमध्ये कोसळली, ज्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. आपत्कालीन सेवा मॅगन डेव्हिड अॅडोमने दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी १० नागरिक जखमी झाले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. स्थानिक प्रशासन आणि लष्कर सज्ज असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
या संपूर्ण संघर्षावर चीननेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांमधील चीनचे राजदूत फू कांग यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “इस्रायलने इराणच्या संप्रभुतेचे, सुरक्षेचे आणि सीमांचे उल्लंघन केले आहे.” त्यांनी इस्रायलला तातडीने त्याच्या धोकादायक लष्करी कारवाया थांबवण्याचे आवाहन केले. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलच्या आक्रमक धोरणामुळे तणाव वाढत असून, हा संघर्ष संपूर्ण पश्चिम आशियात पसरू शकतो, अशी भीती चीनने व्यक्त केली आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर मेजर जनरल अहमद वाहिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलच्या अनेक प्रमुख लष्करी तळांवर लक्ष्य करून हल्ला केला आहे. यात नेवाटिम एअरबेस, एफ-३५, एफ-१६ व एफ-१५ लढाऊ विमाने, कमांड अँड कंट्रोल सेंटर, इलेक्ट्रॉनिक युद्ध केंद्रे, संरक्षण मंत्रालय, तसेच लष्करी उद्योग केंद्रांचा समावेश आहे. हे हल्ले तंत्रशुद्ध आणि पूर्वनियोजित असल्याचे ते म्हणाले.
या हल्ल्यानंतर इराणमधील तेहरान शहरातही सावधगिरी बाळगण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, मोनिरियाह भागात हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून, हा भाग इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निवासस्थानाजवळ आहे. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel-Iran War : इस्त्रायलच्या हल्ल्याला इराणकडून जोरदार प्रत्युत्तर; शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली
या घडामोडींमुळे मध्यपूर्व आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिका, रशिया, चीन आणि युरोपियन देशांनी दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन केले असले तरी, इस्रायल-इराण संघर्षाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विश्लेषकांचे मत आहे की, जर हा संघर्ष आणखी वाढला तर त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतात, विशेषतः तेल पुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भू-राजकीय संतुलनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
इराणचा अमेरिकेला थेट इशारा, चीनची स्पष्ट नाराजी आणि इस्रायलची आक्रमकता पाहता, या संघर्षाने तिसऱ्या जागतिक युद्धाच्या शक्यतेकडे झुकण्याची भीती निर्माण झाली आहे. आता संपूर्ण जगाच्या नजरा या संघर्षाच्या पुढील टप्प्याकडे लागल्या आहेत – संयम राखला जाईल का, की आणखी मोठे युद्ध होईल?