गाझातील मानवतावादी मदतीत अडथळे; इस्रायलवर मागण्या पूर्ण न केल्याचा आंतरराष्ट्रीय संघटनांचा आरोप
जेरूसेलम: गेल्या एक वर्षापासून गाझामध्ये इस्त्रायल-हमास यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. यामुळे गाझामधील अनेक पॅलेस्टिनी नागरिंकाना जीव गमवावा लागला आहे. तसेच गाझामधील अनेक लोकांपर्यंत मानतवादी मदत पोहचण्यासही अनेक अडथळे आले आहेत. अनेक लोकांपर्यंत अजूनही कोणतीही मदत पोहोचलेली नाही. यामुळे गाझामधील लोकांपर्यंत मानवतावादी मदत पोहोचण्यात अडथळे येत असल्याचा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी इस्रायलवर केला आहे.
अमेरिकेच्या मागण्या पूर्ण करण्यात इस्रायल अपयशी ठरल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, गाझामधील युद्धादरम्यान पीडित लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक अन्न. औषधे, पाणी आणि इतर जीवनावश्यक गोष्टी पोहोचण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्य जो बायडेन यांनी इस्त्रायलला आवाहन केले होते. या मागण्या पूर्ण करण्यासाठी इस्त्रायलला 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही मदत नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी मानवतावादी मदत पोहोचवण्याच्या अमेरिकेच्या मागण्या पूर्ण करण्यात इस्रायल अपयशी ठरल्याचा आरोप इस्त्रायलवर केला आहे.
इस्रायलला अमेरिकेकडून मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्यात येईल
आंतरराष्ट्रीय संघटनांनी दावा केला आहे की, इस्रायलने मदतीचे प्रमाण वाढवण्यासाठी अपेक्षित पावले उचलली नाहीत. यामुळे गाझामधील अनेकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत गाझाला पुरेशी मदत पोहोचत नाही, तोपर्यंत इस्रायलला अमेरिकेकडून मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांवर निर्बंध लागू होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
इस्त्रायचा मदतीसाठी पाऊले उचलल्याचा दावा
युद्धग्रस्त गाझामध्ये दररोज किमान 350 ट्रक माल पाठवण्याची मागणी अमेरिकेच्या पत्रात स्पष्ट करण्यात आली होती. याशिवाय, मदत पोहोचवण्यासाठी पाचवा प्रवेश बिंदू उघडणे, हिवाळ्यापूर्वी निवाऱ्यांची व्यवस्था करणे, तंबू शिबिरे उभारणे आणि मदत संस्थांना सहज प्रवेश देणे यांसारख्या मुद्द्यांवरही अमेरिकेने भर दिला आहे. तथापि, इस्रायलने या 15 उपायांपैकी केवळ चारच अंशतः पूर्ण केल्याचेही आंतरराष्ट्रीय अहवालातून समोर आले आहे.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्री गिडॉन सार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गाझामधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पावले उचलली जातील. परंतु अजूनही इस्रायलकडून पुरेशी मदत पोहोचत नसल्याची टीका अमेरिकेचे अधिकारी करत आहेत. इस्रायलच्या बाजूने याबाबत काही प्रयत्न झाले असले तरी, गाझामधील नागरीकांना रोजच्या गरजांसाठी देखील भीषण संघर्ष करावा लागत आहे.
इस्रायलवर दबाव वाढवण्याची शक्यता
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी इस्रायलला अधिक मदत पोहोचवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन स्पष्ट होते की, गाझामधील लोकांपर्यंत अधिक मदत पोहोचवण्याच्या प्रक्रियेत अद्यापही मोठ्या अडचणी येत आहेत आणि त्यासाठी इस्रायलवर आणखी दबाव वाढवण्याची शक्यता आहे.