Israel-Hamas War: इस्त्रायलचे गाझावर विनाशकारी हल्ले; 24 तासांत 46 जणांचा मृत्यू
देर अल-बालाह: एकीकडे इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्ध सुरू असून दुसरीकडे इस्त्रायल हमास विरोधी संघर्ष देखील सुरू आहे. ही युद्धे थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध शीगेला पोहोचले आहे. गाझापट्टीत हिसांचार वाढला आहे. इस्त्रायली सैन्याने गाझावर पुन्हा एकदा विनाशकारी हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये 24 तासांत 46 लोकांचा मृत्यु झाला आहे.याशिवाय इस्त्रायलने घोषित केलेल्या मानवतावादी क्षेत्रावरही हल्ले करण्यात आले आहेत.
जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्याच्या प्रयत्नांत अडचणी
मिळालेल्या माहितीनुसार, लोकांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये, विशेषतः एका कॅफेटेरियामध्ये उपस्थित 11 लोकांना यामध्ये प्राण गमवावे लागले. या हिंसाचारामुळे संपूर्ण गाझामध्ये भीतीचे वातावरण निर्माण पसरलेले आहे. तर जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्याच्या प्रयत्नांत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे गाझामधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनत चालली आहे.
स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण
याशिवाय, लेबनॉनमधील बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवरही इस्रायली सैन्याच्या लढाऊ विमानांनी हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा परिसर हिजबुल्ला संघटनेचे ठिकाण असल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे. इस्रायली सैन्याने यापूर्वी येथे रहिवाशांना घर रिकामी करण्याची सूचना दिली होती. या हल्ल्यामुळे संपूर्ण क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली असून, लोक भयभीत झाले आहेत. बेरूतमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने स्थानिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही हल्ले
मीडिया रिपोर्टनुसार, गाझाच्या दक्षिणेकडील नासिर हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यात दोन मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, उत्तरेकडील बीट हानौन शहरातील हल्ल्यात 15 लोक ठार झाले आहेत. यामध्ये अल जझीराचे पत्रकार होसम शबात यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता अशी माहिती समोर आली आहे. गाझामध्ये वैद्यकीय सुविधांची अवस्था अत्यंत गंभीर बनली आहे. अनेक डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीयांवरही हल्ले केले जात आहेत. या परिस्थितीत जखमींना मदत पोहोचवणे कठीण बनले आहे. रुग्णालयांवरही थेट हल्ले होत आहेत.
अमेरिकाची लष्करी मदत अजूनही सुरूच
अमेरिकेने गाझाला मानवतावादी मदत पाठवण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरही इस्रायलला दिलेली लष्करी मदत कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या संघर्षात आणखी तीव्रता येण्याची शक्यता आहे. गाझामधील या ताज्या हल्ल्यांनी तेथील सामान्य जनतेला गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. या युद्धाच्या सर्पिल प्रवाहात पॅलेस्टिनी लोकांचे जीवन अधिकच कठीण बनत चालले आहे.
हे देखील वाचा- लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागांवर इस्त्रायलचा भीषण हल्ला; 20 हून अधिक लोक ठार