Italy's Meloni under Judicial investigation over release of Libyan suspect
रोम: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सध्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मेलोनी यांच्याविरोधात न्यालयीन चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे त्यांच्यावर मोठा रादजकीय दबाव निर्माण झाला आहे. मेलोनी यांच्यावर इटलीत अटक कलेल्या लिबियन पोलिस अधिकाऱ्याला सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते असे म्हटले जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मीडिया रिपोर्टनुसार, लीबियाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी ओसामा एलमसरी नजीम यांना काहीदिवसांपूर्वी अटक केली होती. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय (ICC) ने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. त्यांच्यावर हत्या, लैंगिक शोषण, आणि छळाचे गंभीर आरोप आहेत. मात्र, काही दिवसांनंतर इटली सरकारने नजीम यांना मुक्त करून सरकारी विमानाने लीबियाला पाठवले.
या निर्णयावर ICC ने आक्षेप घेतला असून, त्याबद्दल कोणतीही पूर्वसूचना न दिल्याचा आरोप केला आहे. सध्या या मुद्द्यावरून इटलीमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे मेलोनी यांच्याविरोधात न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान मेलोनींची प्रतिक्रिया
पंतप्रधान मेलोनीं यांनी सोशल मीडियावर या प्रकरणासंबंधित आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवरील एका व्हिडिओ पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्यांना गुन्हेगारीला मदत आणि सार्वजनिक निधीच्या गैरवापराच्या आरोपांखाली चौकशीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, चौकशी सुरू झाल्याचा अर्थ त्यांना दोषी ठरवले गेलेले नाही.
मेलोनी यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, “मी ब्लॅकमेल होणार नाही, ना मी घाबरणार आहे. काही लोकांना इटलीमध्ये बदल होणे पसंत नाही, यामुळे त्यांनी माझ्याविरोधात आहेत. मला खात्री आहे की सत्य बाहेर येईल. “त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, या चौकशीसाठी वकील लुइगी ली गोटी यांनी मागणी केली होती. त्यांनीच नजीम यांची सुटका आणि सरकारी विमानाचा वापर यावर आक्षेप घेत न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
ICC ची भूमिका
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने स्पष्ट केले की, इटलीसह काही देशांना 18 जानेवारी रोजी ओसामा एलमसरी नजीम यांच्या अटकेबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, इटलीने त्यांना का सोडले, याची कोणतीही माहिती ICC ला मिळालेली नाही. ICC ने असेही सांगितले की, इटलीला जर सहयोग करण्यात कोणती अडचण येत असेल, तर त्यांनी तातडीने न्यायालयाशी संपर्क साधायला हवा होता.
या प्रकरणामुळे इटलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मेलोनी यांना या चौकशीचा मोठा फटका बसू शकतो. मात्र, त्यांनी स्पष्ट केले आहे की, ते राजीनामा देणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली काम करणार नाहीत. आता पुढील काळात या प्रकरणाचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.