Steve Jobs Wife Laurones Powell's News today
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानाचा शुभारंभ झाला. या वेळी अनेक अखाड्यांच्या नागा साधू, महंत, संत आणि लाखो भाविकांनी गंगेमध्ये आस्था आणि भक्तीने स्नान केले. महाकुंभासाठी देश-विदेशातून लाखो भाविक या मेळ्याला आले आहेत तर अजून सुमारे 45 कोटी भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या काळात, अनेक परदेशी भाविकही महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी येत आहे. दरम्यान स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी कमला उर्फ लॉरेन्स यांनीही पहिल्या दिवशी कुंभमेळ्याला हजेरी लावली.
स्टीव जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल आजारी पडल्या
मात्र, या दरम्यान स्टीव जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स आजारी पडल्याची बातमी समोर आली आहे. अखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांनी सांगितले की, लॉरेन पॉवेल जॉब्स या शाही स्नानामध्ये सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यांना हातांवर ॲलर्जी झाली आहे. महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, लॉरेन पॉवेल जॉब्स कधीही अशा मोठ्या गर्दीत गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना थेट शाही स्नानासाठी नेण्याऐवजी वेगळ्या पद्धतीने स्नान घालण्याची व्यवस्था केली जाईल. त्या अत्यंत भावूक अवस्थेत आहेत आणि त्यांना अनेक प्रश्न पडले असून त्यांची उत्तरे त्यांना दिली जात आहेत.
पूजन विधींमध्ये सहभाग लॉरेन पॉवेल जॉब्स सहभागी
महामंडलेश्वरांनी असेही स्पष्ट केले की, लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी शाही स्नानात सहभागी न होता, रात्रीच्या पूजन विधींमध्ये सहभाग घेतला आहे. त्या हवन आणि पूजेमध्ये सहभागी होत आहेत आणि शिविरात विश्रांती घेत आहेत. त्यांना भारतीय अध्यात्माबद्दल प्रचंड कुतूहल आहे. महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांनी सागितले की, लॉरेन पॉवेल जॉब्स या अतिशय श्रीमंत कुटुंबातील असूनही, त्यांच्या स्वभावात अहंकार नाही. त्या साधेपणाने आणि सहजतेने जीवन अनुभवत आहेत. या शिविरात राहून त्या आनंद आणि शांततेचा अनुभव घेत आहेत.
लॉरेनच्या शाही स्नानासाठी स्वतंत्र्य व्यवस्था
लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभातील पूजन आणि अभिषेक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. त्या महादेवाच्या पूजेसाठी स्वतःच्या हाताने तयारी करत आहेत आणि त्या या अनोख्या आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव घेत आहेत. त्यांच्या शाही स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे, जेणेकरून त्या गर्दीपासून दूर शांततेत स्नान करू शकतील. भारतीय संस्कृती आणि अध्यात्माविषयीच्या त्यांच्या जिज्ञासेमुळे आणि सहभागामुळे त्या या कुंभमेळ्याचा एक महत्त्वाचा भाग ठरत आहेत. त्यांचा हा प्रवास भारतीय अध्यात्माच्या अंतरंगांचा अनुभव घेण्यासाठीचा आहे, ज्यामुळे त्यांना नवा दृष्टिकोन मिळत आहे.