
Maryam Nawaz Jhelum Visit Rawalpindi Board Computer Science Exam
पाकिस्तानमधून (Pakistan) एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या नियोजित दौऱ्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक अचानक कोलमडले आहे. झेलम जिल्ह्यात १० नोव्हेंबर रोजी पार पडणारी महत्त्वाची संगणक विज्ञान (Computer Science) परीक्षा ऐन वक्त्यावर रद्द करावी लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय तयारीमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या शिफारसीनंतर रावळपिंडी बोर्डाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, आता हा पेपर ३० नोव्हेंबर रोजी घेतला जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचा झेलम आणि पिंड दादन खान या भागांत महत्त्वाचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या उच्चस्तरीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय तयारी करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. झेलमच्या उपायुक्तांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रावळपिंडी बोर्डाच्या अध्यक्षांना एक विशेष पत्र लिहिले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Diwali : अमेरिकेत हिंदूं उत्सवावर वंशद्वेषाचे सावट; ट्रम्प यांच्या समर्थकांचा सिएटलमध्ये दिवाळी कार्यक्रमात गोंधळ
या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी मोठ्या संख्येने सरकारी अधिकारी, पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत जर त्याच दिवशी परीक्षा घेतली, तर वाहतुकीची कोंडी, सुरक्षेचे प्रश्न आणि इतर प्रशासकीय अडचणींमुळे हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात, या उद्देशापोटी उपायुक्तांनी १० नोव्हेंबर रोजी होणारी संगणक विज्ञान परीक्षा रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची जोरदार शिफारस केली होती.
उपायुक्तांच्या या शिफारसीची तात्काळ दखल घेत रावळपिंडी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने (BISE) २०२६ च्या माध्यमिक द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. बोर्डाचे प्रवक्ते अरसलान चीमा यांनी मीडियाशी बोलताना या बदलाबाबत सविस्तर माहिती दिली.
परीक्षा नियंत्रक मुबाशीर सईद यांनी नवीन तारखेबाबतची अधिकृत सूचना जारी केली आहे. त्यानुसार, पूर्वी १० नोव्हेंबर रोजी होणारी संगणक विज्ञान परीक्षा आता ३० नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. विशेष म्हणजे, सकाळच्या सत्राचा पेपर सकाळीच आणि संध्याकाळच्या सत्राचा पेपर पूर्वनिश्चित वेळेनुसार संध्याकाळीच होईल. विद्यार्थ्यांसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, यापूर्वी जाहीर झालेली सर्व परीक्षा केंद्र (Exam Centers) तशीच कायम ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही नवीन केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Horizon Europe : भारताचा ‘होरायझन युरोप’मध्ये प्रवेश निश्चित; युरोपियन युनियनसोबतच्या वाटाघाटी यशस्वी, संशोधकांसाठी सुवर्णकाळ
अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की हा बदल संपूर्ण पाकिस्तानसाठी आहे का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. रावळपिंडी शिक्षण बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर जिल्ह्यांमध्ये परीक्षांचे वेळापत्रक पूर्ववत राहिल. १० नोव्हेंबर रोजी इतर सर्व भागांत नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा पार पडतील. हा संपूर्ण बदल केवळ आणि केवळ झेलम जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.
परीक्षा पुढे ढकलल्यामुळे झेलममधील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्सच्या पेपर तयारीसाठी तब्बल २० दिवस अधिक मिळाले आहेत. परीक्षा नियंत्रक मुबाशीर सईद यांनी स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या अधिक सोयीसाठी आणि गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण बोर्डाकडून नवीन रोल नंबर स्लिप्स (Roll Number Slips) जारी केल्या जातील.
तथापि, ज्या विद्यार्थ्यांकडे आधीच जुन्या स्लिप्स आहेत, त्या देखील पूर्णपणे वैध मानल्या जातील. म्हणजेच, जर कोणाला नवीन स्लिप मिळाली नाही किंवा काही तांत्रिक कारणामुळे ती हातात आली नाही, तर विद्यार्थी त्यांच्या जुन्या रोल नंबर स्लिपच्या आधारावर देखील आरामात परीक्षा देऊ शकतील. प्रशासनाच्या या लवचिक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. राजकारण्यांच्या दौऱ्यांमुळे नेहमीच सामान्य जनतेला आणि विशेषतः विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याबाबत पालकांमध्ये काही प्रमाणात नाराजी असली, तरी बोर्डाच्या या वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
Ans: झेलम जिल्ह्यात १० नोव्हेंबर रोजी होणारी संगणक विज्ञान (Computer Science) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
Ans: ही परीक्षा आता १० नोव्हेंबर ऐवजी ३० नोव्हेंबर रोजी घेतली जाईल.
Ans: पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या झेलम दौऱ्यामुळे प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.