modi special meeting cai qi china more significant than jinping
Modi Cai Qi meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे जागतिक राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकीत सहभागी होण्यासाठी मोदी चीनच्या तियानजिंग शहरात पोहोचले होते. या दौऱ्यात मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. पण याहूनही जास्त चर्चेत राहिली ती मोदींची ‘काई ची’ या चिनी नेत्याशी झालेली भेट.
काई ची हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (CPC) सर्वोच्च नेतृत्वाचा भाग आहेत. ते पॉलिटब्युरो स्थायी समितीचे (PSC) सदस्य आहेत आणि या समितीत फक्त सात सदस्य असतात. ही समिती म्हणजे चीनमधील सर्वात ताकदवान आणि अंतिम निर्णय घेणारी संस्था. तसेच, काई ची हे CPC च्या जनरल ऑफिसचे संचालकही आहेत. ही भूमिका लोकांसमोर फारशी दिसत नाही, परंतु चीनच्या परराष्ट्र आणि अंतर्गत धोरणात तिचे महत्त्व अमूल्य मानले जाते.
मोदींनी काई ची यांच्याशी केलेली चर्चा ही साधी शिष्टाचार भेट नव्हती. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत विचारांची देवाणघेवाण केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, मोदींनी भारत-चीन संबंधांबद्दल आपला दृष्टीकोन स्पष्ट केला, तर काई ची यांनी शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील धोरणांनुसार भारताशी अधिक सहकार्य वाढविण्याची तयारी दर्शवली. महत्त्वाचे म्हणजे चीनमध्ये परराष्ट्र धोरण फक्त परराष्ट्र मंत्रालय ठरवत नाही. ते कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सल्ल्यानुसार आखले जाते. त्यामुळे मोदींची काई ची यांच्याशी झालेली भेट म्हणजे भारताशी संबंध सुधारण्यासाठी चीनच्या शीर्ष नेतृत्वाची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कैलास मानसरोवर यात्रेपासून ते थेट विमान प्रवासापर्यंत शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
काई ची हे शी जिनपिंग यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. दोघांनी फुजियान आणि झेजियांग प्रांतात एकत्र काम केले आहे. 2022 च्या बीजिंग हिवाळी ऑलिंपिकचे नियोजन आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारीही काई ची यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. आज ते जिनपिंग यांचे विश्वासू ‘हात’ म्हणून ओळखले जातात. चीनमधील प्रशासकीय अडथळे दूर करून परकीय देशांशी संबंध दृढ करण्यामध्ये त्यांची निर्णायक भूमिका असते.
ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करत आहे. त्यामुळे अमेरिका भारतावर ५०% पर्यंत शुल्क आकारत आहे आणि ट्रम्प प्रशासन सतत भारताविरोधात भूमिका घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर चीनकडून भारताशी उच्चस्तरीय संवाद वाढवला जाणे, हे जागतिक समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
चीनमध्ये पंतप्रधान मोदींसारख्या परदेशी नेत्यांची भेट साधारणतः अध्यक्ष किंवा परराष्ट्र मंत्र्यांपुरती मर्यादित असते. पण काई ची यांच्याशी झालेली ही बैठक दर्शवते की चीन भारताशी केवळ राजनैतिक संवादापुरते मर्यादित राहत नाहीये, तर कम्युनिस्ट पक्षाच्या मूळ नेतृत्वालाही यात सक्रिय केले आहे. हे भारतासाठी एक ‘स्ट्रॅटेजिक संकेत’ मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : india china summit : पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्याबद्दल चिनी मीडियाने नक्की काय लिहिले? वाचा सविस्तर…
भारत-चीन संबंध गेल्या काही वर्षांत सीमेवरील तणावामुळे सतत गुंतागुंतीचे राहिले आहेत. परंतु, या भेटीतून दोन्ही देश संवादाची नवी दिशा शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. काई ची यांच्याशी मोदींची झालेली बैठक हे पाऊल भारत-चीन संबंधांमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकते.