कैलास मानसरोवर यात्रेपासून ते थेट विमान प्रवासापर्यंत शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात 'या' मुद्द्यांवर चर्चा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
SCO Summit 2025, तियानजिन (चीन) : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील द्विपक्षीय बैठक ही गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांच्या नातेसंबंधांना नवीन गती देणारी ठरली आहे. कझानमध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या शेवटच्या भेटीनंतर आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक वातावरणाची नांदी दिली आहे.
मोदी-शी बैठकीतील सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी नसून विकास भागीदार आहेत. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता नसेल तर द्विपक्षीय संबंधांमध्ये खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकत नाही. गेल्या वर्षी झालेल्या सीमावरील विच्छेदनानंतर निर्माण झालेल्या विश्वासाबद्दलही दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, सीमा विवादावर न्याय्य आणि सर्वमान्य तोडगा काढण्याची तयारी दर्शवली.
भारत-चीन संबंधांमध्ये व्यापार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताच्या दृष्टीने व्यापार तूट मोठा प्रश्न आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सहकार्याची तयारी दाखवली. चीनकडून गुंतवणूक वाढवणे, भारतात तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना चालना देणे यावर चर्चा झाली. त्याचबरोबर थेट उड्डाणे सुरू करण्यास, व्हिसा सुविधा सुलभ करण्यास आणि कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यास दोन्ही बाजूंनी संमती दर्शवली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : india china summit : पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्याबद्दल चिनी मीडियाने नक्की काय लिहिले? वाचा सविस्तर…
या बैठकीत केवळ व्यापारच नव्हे, तर लोकांमधील संपर्क वाढविण्यावर विशेष भर दिला गेला. मोदींनी स्पष्ट केले की, भारत आणि चीन या दोन प्राचीन संस्कृतींमध्ये परस्पर संवाद वाढवणे हे भविष्यासाठी सकारात्मक ठरेल. पर्यटन, विद्यार्थी आदान-प्रदान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विश्वासाची पायाभरणी अधिक भक्कम करण्याचे ठरले.
🚨 During his bilateral with 🇨🇳 President Xi Jinping, 🇮🇳 PM Modi said:
— Agreement reached by Special Representatives on border management
— Kailash Mansarovar Yatra resumed
— Direct flights restarting“We will move forward on the basis of mutual trust, respect & sensitivity.” pic.twitter.com/BIXj7gMNqd
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 31, 2025
credit : social media
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बैठकीत सांगितले की, “आज जग शतकातून एकदा येणाऱ्या मोठ्या बदलातून जात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर आणि अराजक असली तरी चीन-भारत संबंधांना नवे महत्त्व प्राप्त होत आहे.” त्यांनी हेही नमूद केले की, या वर्षी चीन-भारत राजनैतिक संबंधांचा ७५ वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने दोन्ही देशांनी सहकार्याचे नवे पर्व सुरू करावे.
मोदींनी बैठकीत सांगितले की, भारत आणि चीन हे दोघेही आपली धोरणात्मक स्वायत्तता जपतात. म्हणूनच त्यांच्या नात्यांकडे कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये. जागतिक स्तरावरील दहशतवाद, हवामान बदल, निष्पक्ष व्यापार यांसारख्या गंभीर प्रश्नांवर दोन्ही देशांनी सहकार्य वाढवावे, यावर सहमती झाली.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष शी यांना २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले. शी जिनपिंग यांनी हे आमंत्रण स्वीकारले आणि भारताच्या अध्यक्षपदाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia Protests : 50 लाखांचा भत्ता अन् भडकली जनता; इंडोनेशियात अर्थमंत्र्यांच्या घरावर हल्ला, निदर्शनांना हिंसक वळण
पंतप्रधान मोदींनी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो स्थायी समिती सदस्य काई ची यांचीही भेट घेतली. काई यांनीही भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची तयारी व्यक्त केली. ही बैठक केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित न राहता, विश्वास, सहकार्य आणि नवा अध्याय या तीन गोष्टींवर केंद्रित होती. कैलास मानसरोवर यात्रेसारख्या सांस्कृतिक दुव्यांपासून ते थेट उड्डाणे आणि व्यापार करारांपर्यंत भारत-चीन नात्यांमध्ये एक सकारात्मक गती निर्माण झाल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.