
Regional Environmental Change Everest study
जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर (Mount Everest) जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) भीषण परिणाम आधीच दिसून येत आहे. परंतु, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘रिजनल एन्व्हायर्नमेंटल CHANGE’ (Regional Environmental Change) (Climate Change)या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, माउंट एव्हरेस्टच्या ‘खुंबू हिमनदी’वर (Khumbu Glacier) असलेल्या बेस कॅम्पमधील मानवी हालचाली, इंधनाचा वापर आणि खुद्द गिर्यारोहकांच्या मूत्रातील उष्णता बर्फ वेगाने वितळवण्यास हातभार लावत आहे.
नेपाळच्या भू-व्यवस्थापन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिकन संशोधकांच्या एका संयुक्त पथकाने हा अभ्यास केला आहे. दरवर्षी मार्च ते मे दरम्यान चालणाऱ्या एव्हरेस्ट गिर्यारोहण हंगामात बेस कॅम्पवर एका छोट्या शहरासारखी वस्ती तयार होते. सुमारे १,६०० हून अधिक तंबू उभारले जातात, जिथे २,००० पेक्षा जास्त गिर्यारोहक, शेर्पा आणि सपोर्ट स्टाफ एकत्र राहतात. या भागात उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा, वीजनिर्मिती आणि स्वयंपाकासाठी जाळले जाणारे इंधन स्थानिक तापमानात प्रचंड वाढ करत आहे.
संशोधनातील सर्वात आश्चर्यकारक आणि अत्यंत चर्चेत आलेला भाग म्हणजे गिर्यारोहकांच्या शरीरातून निघणारे मूत्र. जास्त उंचीवर ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने आणि डिहायड्रेशन (Dehydration) टाळण्यासाठी गिर्यारोहकांना प्रचंड प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थ प्यावे लागतात. परिणामी, २०२३ च्या गिर्यारोहण हंगामात बेस कॅम्पवर दररोज सरासरी ६,७६६ लिटर मूत्र तयार झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jammu-Kashmir: ‘जम्मू-काश्मीर अन् लडाख भारताचाच अविभाज्य भाग’; बर्मिंघम महापौरांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर भारताचा प्रहार
मानवी शरीरातून बाहेर पडताना मूत्राचे तापमान साधारण ३७ अंश सेल्सिअस (98.6°F) असते. बेस कॅम्पवर घन कचरा (Solid Waste) ड्रममध्ये साठवून खाली आणला जातो; परंतु द्रव कचरा म्हणजेच मूत्र थेट बर्फावर किंवा खडकांवर सोडले जाते. या मूत्रातील उष्णता सभोवतालच्या बर्फात हस्तांतरित होते. गणितीय मॉडेलनुसार, केवळ या मूत्राच्या उष्णतेमुळे एका हंगामात सुमारे १५४ टन बर्फ वितळू शकतो. जरी हे मूत्र हवेच्या संपर्कात येऊन वेगाने थंड होत असले, तरी त्याचा अल्प पण मोजता येण्याजोगा प्रभाव हिमनदीवर नक्कीच पडत आहे.
संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, लघवी हे बर्फ वितळण्याचे एकमेव किंवा मुख्य कारण नसून मानवी इंधन वापर हा सर्वात मोठा घटक आहे. २०२३ च्या ५० दिवसांच्या हंगामात बेस कॅम्पवर सुविधा पुरवण्यासाठी ८२४ एलपीजी सिलिंडर, १८,९३५ लिटर केरोसीन (रॉकेल) आणि ५,१३० लिटर पेट्रोल वापरण्यात आले होते.
या सर्व इंधनाच्या ज्वलनातून सुमारे ८,४९,१७४ मेगावॅट ऊर्जा/उष्णता बाहेर पडली. शास्त्रज्ञांच्या मते, मानवी क्रियाकलापांमुळे होणाऱ्या एकूण २४९२ टन बर्फ वितळण्यापैकी सुमारे ९४ टक्के वाटा हा इंधनातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा आहे, तर सुमारे ६ टक्के वाटा मूत्रातील उष्णतेचा आहे. हे वितळलेले पाणी एका ऑलिंपिक आकाराचा स्विमिंग पूल किंवा १६,७०० आंघोळीचे टब भरण्यासाठी पुरेसे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
उपग्रह डेटा (Landsat Imagery 1991-2023) चे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांना आढळले की, खुंबू हिमनदीच्या इतर भागांपेक्षा बेस कॅम्प असलेल्या भागाचे भूपृष्ठ तापमान दरवर्षी ०.२८ अंश सेल्सिअसने वाढत आहे जो इतर बर्फाच्छादित भागापेक्षा दुप्पट दर आहे. २००० सालापासून संपूर्ण हिमालयातील हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पट झाला आहे.
शास्त्रज्ञांनी सुचवले आहे की, एव्हरेस्ट मोहिमा पूर्णपणे बंद करणे शक्य नसले, तरी बेस कॅम्पवर सौर ऊर्जेचा (Solar Energy) वापर वाढवणे, इंधनाचा वापर मर्यादित करणे आणि भविष्यात बेस कॅम्प हिमनदीवरून हटवून सुरक्षित खडकाळ भागात हलवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.