बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा; मोहम्मद युनूस यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण
बांगलादेशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांची तारीख अखेर निश्चित झाली आहे. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात 2026 मध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात (1 ते 15 एप्रिल दरम्यान) सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली. ईद-उल-अजहा पूर्वसंध्येला केलेल्या या घोषणेमुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तणावाला आणि निवडणुकीच्या तारखांबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
डॉ. युनुस यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोग लवकरच एक सविस्तर अहवाल सादर करेल. अंतरिम सरकारने ‘सुधारणा, न्याय आणि निवडणूक’ या तीन प्रमुख उद्दिष्टांसह कारभार स्वीकारला असून, देशातील सर्वच राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून निवडणूक प्रक्रियेला सर्वमान्य आणि पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.“ही निवडणूक बांगलादेशाच्या इतिहासातील सर्वाधिक स्वतंत्र, निष्पक्ष, स्पर्धात्मक आणि स्वीकारार्ह ठरेल,” असे आश्वासन देताना डॉ. युनुस यांनी सांगितले की, या निवडणुकीच्या माध्यमातून शहीदांच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल आणि ही प्रक्रिया देशाच्या राजकीय पारदर्शकतेसाठी एक उदाहरण ठरेल.
या घोषणेनंतर देशातील राजकीय वर्तुळात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा शेवट झाला आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर 2025 ते जून 2026 या दरम्यान निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिले होते. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी डिसेंबर 2025 पूर्वीच निवडणुका घेण्याची मागणी केली होती, तर नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल सिटिझन पार्टीने (NCP) सुधारणा पूर्ण झाल्यावरच निवडणुका घ्याव्यात, अशी भूमिका मांडली होती. दरम्यान, देशात रिफॉर्म कमिशनची स्थापना करण्यात आली असून, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये न्यायप्रणाली व प्रशासनिक सुधारणा अंतिम रूपात राबवण्याचे उद्दिष्ट असल्याचे युनुस यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, “राजकीय स्थैर्य आणि स्थायी सरकार स्थापन करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.”
‘गाझातील प्रत्येक कारवाईचा आम्ही बदला घेणार’; हुथींनी पुन्हा इस्रायलच्या विमानतळाला केले लक्ष्य
2024 मध्ये बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली होती. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात कोटा प्रणालीच्या मुद्द्यावरून देशभर आंदोलन झाले आणि अखेर 5 ऑगस्ट 2024 रोजी शेख हसीना यांना देश सोडावा लागला. त्या सध्या भारतात निर्वासित अवस्थेत आहेत. त्यानंतर तीन दिवसांत मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.भारताने यापूर्वी बांगलादेशमध्ये लवकरात लवकर स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुकांची मागणी केली होती. तसेच, शेख हसीनांच्या आवामी लीगवर घातलेल्या बंदीबाबत चिंता व्यक्त केली होती.