Muhammad Yunus congratulates Hindus in Bangladesh on basant Panchami
ढाका: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशातील हिंदू समाजाला सरस्वती पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज संपूर्ण जगभरात हिंदू वसंत पंचमी साजरी केली जात असून आजच्या दिवशी विद्येची देवता देवी सरस्वतीचे पूजने केले जाते. या निमित्ताने युनूस यांनी बांगलादेशच्या सर्व नागरिकांना मैत्री आणि शांततेचा संदेश दिला आहे. तसेच त्यांनी बांगलादेशला एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून संबोधले आहे.
बांगलादेश एक सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष देश
मोहम्मद युनूस यांनी आपल्या संदेशात बांगलादेश हा विविध धर्म, जात आणि संप्रदाय यांना एकत्र घेऊन चालणारा देश असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “हजारो वर्षांपासून या देशात सर्व धर्मांचे लोक एकत्र राहत आले आहेत. हा देश सर्वांचा आहे आणि येथे प्रत्येक व्यक्तीला सुरक्षिततेची हमी आहे, मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो.”
त्यांनी पुढे म्हटले की, “5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी, कामगारांनी आणि जनतेने दिलेल्या अभूतपूर्व विद्रोहामुळे अंतरिम सरकारची स्थापना झाली. हे सरकार जात, धर्म, आणि वर्ग यापलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समान अधिकारांसाठी कार्यरत आहे.”
मोहम्मद युनूस यांनी देवी सरस्वती यांच्या प्रतीकात्मकतेबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी सांगितले की, “देवी सरस्वती सत्य, न्याय आणि ज्ञानाच्या प्रकाशाचा प्रतीक आहेत. त्या वाणी, विद्या आणि माधुर्याच्या सर्वोच्च शक्ती आहेत.” मोहम्मद युनूस यांनी हिंदू समाजाला शुभेच्छा देताना आवाहन करत म्हटले की, “या विशेष प्रसंगी, मी सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की ते ज्ञानाचे उपासक बनून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देतील.”
अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य
मोहम्मद युनूस यांनी हा संदेश अशा वेळी आला आहे, जेव्हा बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेख हसीना सरकारच्या पतनानंतर हिंदू विरोधी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, अंतरिम सरकारकडून फेटाळल्या गेल्या आहेत.
सरस्वती पूजेच्या निमित्ताने दिलेला हा संदेश बांगलादेशातील धार्मिक एकात्मता आणि शांततेचे प्रतीक मानला जात आहे. मोहम्मद युनूस यांनी देशाच्या सर्व नागरिकांसाठी शांती, समृद्धी आणि कल्याणाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, हिंदू समाजाने देशाच्या प्रगतीसाठी सक्रिय योगदान द्यावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.