Pakistan Army Chief Asim Munir got trolled for the medals
Asim Munir medals controversy : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे सध्या मोठ्या चर्चेत आहेत. कारण त्यांच्या गणवेशावर झळकणारी पदकांची झळाळी आता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. पाकिस्तानच्या लष्करावर भारताशी ऑपरेशन सिंदूरमधील अपयशानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होत असतानाच, “एकही युद्ध न जिंकता इतकी पदके का?” असा सवाल पाकिस्तानी जनता आणि लष्कर निरीक्षक उपस्थित करत आहेत.
नोव्हेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्त झालेल्या जनरल असीम मुनीर यांनी आजवर कोणतेही युद्ध लढलेले नाही, हे निर्विवाद आहे. त्यांचा कार्यकाळ प्रमुखत्वे दहशतवादविरोधी मोहिमांपुरता मर्यादित आहे. बलुचिस्तानमधील फुटीरतावाद्यांविरुद्ध किंवा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) विरोधातील कारवायाही लष्करी मोहिमांमध्ये मोजल्या जातात, युद्धात नव्हे. त्यामुळे त्यांच्या छातीवर लटकलेल्या पदकांबाबत प्रचंड शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. विशेषतः भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लाजिरवाणा पराभव आणि त्यानंतर त्यांनी हाती घेतलेले ‘ऑपरेशन बनायन उल मरसूस’ पूर्णपणे फसले, हे सर्वश्रुत आहे.
1. निशान-ए-इम्तियाज (सैन्य) – डिसेंबर २०२२ मध्ये प्रदान करण्यात आलेला पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान.
2. हिलाल-ए-इम्तियाज – मार्च २०१८ मध्ये प्राप्त.
3. सन्मानाची तलवार (Sword of Honour) – मंगला येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणादरम्यान सर्वोत्तम कामगिरीसाठी.
4. तमघा-ए-दिफा, तमघा-ए-बाका, तमघा-ए-इस्तकबाल, तमघा-ए-आझम – विविध लष्करी मोहिमांसाठी.
5. परदेशी सन्माने – बहरीनचा ऑर्डर ऑफ बहरीन फर्स्ट क्लास, तसेच तुर्कीचा लीजन ऑफ मेरिट.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकीकडे लष्करप्रमुखांना धमकावत होते युनूस, तर दुसरीकडे बांगलादेशच्या सैन्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
विशेष म्हणजे या सर्व पदकांपैकी एकही पदक शौर्यासाठी दिले गेलेले नाही. ही पदके प्रामुख्याने सेवेतील योगदान, प्रशिक्षणातील प्राविण्य, राजनैतिक सहयोग वा मित्र राष्ट्रांतील सहकार्य या निकषांवर मिळालेली आहेत. पाकिस्तानमध्ये लष्करी पदके ही सन्मानापेक्षा अधिक ‘स्थान’ आणि ‘पदोन्नती’शी निगडित झाल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे मुनीर यांच्यावरची टीका केवळ युद्धाच्या अभावापुरती मर्यादित नसून, ती पदक संस्कृतीच्या फोलपणावरही बोट ठेवते.
असीम मुनीर यांनी पाकिस्तानच्या दोन प्रमुख गुप्तचर संस्था – ISI आणि MI – या दोन्हींच्या प्रमुख पदांची जबाबदारी पार पाडलेली आहे. तसेच सौदी अरेबियात पाक सैन्य प्रशिक्षण पथकाचे नेतृत्वही केले आहे. या भूमिकांमध्ये त्यांचे धोरणात्मक योगदान असले तरी, यामधून अखिल पाकिस्तानच्या सामरिक यशाची कथा उदयाला आलेली नाही.
भारताविरोधात सातत्याने अपयश, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा ढासळणे आणि अंतर्गत विद्रोहाबाबत लष्कराची असमर्थता – या पार्श्वभूमीवर असीम मुनीर यांचा पदकांनी सजलेला गणवेश विरोधाभासी वाटतो. पाकिस्तानमधील अनेक लष्कर विश्लेषक आणि माध्यमांनाही याची जाण आहे. त्यामुळेच “एकही युद्ध न जिंकता, इतकी पदके कशासाठी?” हा प्रश्न सध्या जोरात विचारला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानचा दहशतवाद्यांना खुलेआम पाठिंबा? गाझी सैफुल्लाहच्या अंत्यसंस्कारात वॉन्टेड फैसल नदीमची उपस्थिती
असीम मुनीर यांचे लष्करी योगदान नाकारता येणार नाही. परंतु त्यांच्या पदकांच्या माळेकडे पाहता ती वास्तविक शौर्यापेक्षा अधिक राजनैतिक आणि व्यवस्थात्मक सन्मानांची पोचपावती वाटते. पाकिस्तानसारख्या सतत संघर्षात असलेल्या देशात, लष्कराच्या प्रमुखाकडे खऱ्या अर्थाने विजयी इतिहास असावा, अशी अपेक्षा असणे चुकीचे ठरणार नाही. मात्र मुनीर यांच्याबाबत हे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसत नाही.